• Thu. May 1st, 2025

लातूर विभागात सहा हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना वाढीव मानधनाचा लाभ

Byjantaadmin

Mar 23, 2023

लातूर विभागात सहा हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना वाढीव मानधनाचा लाभ

लातूर,  (विमाका) : राज्याचे वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा 2023-24 सालचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मासिक मानधनात दीड हजार रूपयांची वाढ करण्यात आली. लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण 6 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना या वाढीव मानधनाचा लाभ होईल.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक कार्यरत आहेत. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्सहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्त्वपूर्ण असा सामाजिक दुवा म्हणून काम करतात. स्थानिक रहिवासी असल्याने गावच्या आरोग्यविषयक अडचणी सोडवणुकीसाठी त्या योगदान देतात.

आरोग्य संस्थेतील प्रसुतीत वाढ करणे, मलेरिया,  क्षयरोग, साथीचे रोग आदी उपचारासाठी मदत करणे, मोफत असलेल्या संदर्भ सेवेचा प्रचार करणे, कुटुंब कल्याणाचा प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप, किरकोळ आजारांवर उपचार, माता व बाल आरोग्यविषयक प्रबोधन, जसे की प्रसुतीपूर्व तपासणी, प्रसूती पश्चात तपासणी, बालकांचे लसीकरण आदी कामे करणे. जन्म मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये सहकार्य करणे इत्यादी कामे आशा स्वयंसेविका करतात. त्यांच्या कामावर देखरेख गट प्रवर्तक ठेवतात, म्हणून आरोग्य यंत्रणेत महत्त्वाचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्याकडे पाहिले जाते.

राज्यात सुमारे 81 हजार आशा स्वयंसेविका व 3 हजार 500 गट प्रवर्तक आहेत. त्यापैकी लातूर विभागात एकूण 5 हजार 828 आशा स्वयंसेविका, 287 गट प्रर्वतक आहेत. लातूर जिल्ह्यात 01 हजार 906, नांदेड 01 हजार 645, उस्मानाबाद 01 हजार 207, हिंगोली जिल्ह्यात 01 हजार 70 आशा स्वयंसेविका आहेत. लातूर, नांदेड प्रत्येकी 89 तर उस्मानाबाद 61 आणि हिंगोलीत 48 गट प्रर्वतक आहेत. यापूर्वी आशा स्वयंसेविकांना 3 हजार 500 रूपये मानधन होते, ते आता अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे 05 हजार रूपये झाले. तर गट प्रवर्तकांना 04 हजार 700 रूपयांवरून 06 हजार 200 रूपये मानधन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *