५६ हजार कुटुंबांना मिळणार दिवाळी भेट नायबतहसीलदार अनिल धुमाळ यांची माहिती शंभर रुपयात चार वस्तूचा संच
निलंगा, : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सणासुदीच्या दिवसात अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब व शेतकरी शिधापत्रिकाधारकांसाठी घोषित केलेल्या शंभर रुपयात चार वस्तूंचा संच देण्याचा निर्णय घेतला आहे. यास अनुसरून निलंगा तालुक्यातील ५६ हजार ४९७ कुटुंबांना धान्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे व पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अनिल धुमाळ यांनी दिली आहे.
अन्न, नागरी व पुरवठा मंत्रालयाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात येते. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल ( शेतकरी ) शिधापत्रिधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार वस्तूचा संच उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये घेतला आहे. दिवाळीपूर्वी लाभ देण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा असून या योजनेअंतर्गत शंभर रुपयात मिळणाऱ्या संचाचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शासन उपलब्धतेनुसार व पुरवठ्यानुसार तात्काळ वाटप करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून ई – पॉस प्रणालीद्वारे सर्व लाभार्थ्यांपर्यंत वेळेत हे धान्य पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे नायब तहसीलदार श्री. धुमाळ यांनी यावेळी सांगितले. एक शिधाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई – पॉस प्रणालीव्दारे प्रतिसंच शंभर रुपये दराने वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने निलंगा तालुक्याकरीता एकुण ५६ हजार ४९७ संचाची मागणी करण्यात आली असून अंत्योदय अन्न सुरक्षा योजना , प्राधान्य कुटुंब व एपीएल ( शेतकरी ) शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त चार शिधा संचाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये अंत्योदय योजनेतील पात्र शिधापत्रिका धारक लाभार्थी सहा हजार ४८०, प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र शिधा पत्रिकाधारक लाभार्थी ३८ हजार ६७३, एपीएल शेतकरी योजनेतील पात्र शिधा पत्रिकाधारक ११ हजार ३४४ असे एकुण ५६ हजार ४९७ शिधा पत्रिकाधारकांना हा लाभ मिळणार आहे. हा संच दिवाळी पूर्वी लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी पुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे.