• Thu. May 1st, 2025

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा धमाका, थेट बीआरएस पक्षात प्रवेश

Byjantaadmin

Mar 23, 2023

छत्रपती संभाजीनगर : नांदेडमध्ये पाय ठेऊन महाराष्ट्रात प्रवेश केलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाने आता मराठवाड्याच्या राजधानीत प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे आता एमआयएम सारखेच नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर बीआरएसच्या रडारावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे गेल्या काही वर्षांपासून या ना त्या वादाच्या रूपाने चर्चेत असतात. गेली लोकसभा निवडणूक लढवून त्यांनी लाखोची मते मिळवली होती. परिणामी शिवसेनेचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. व एम.आय.एम. पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले होते.

या निवडणुकीनंतर हर्षवर्धन जाधव यांच्या आयुष्यात मोठे चढ उतार आले. अनेक वेळा वादामुळे ते चर्चेत राहिले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लोकसभेत पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा दर्शवीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र पाठिंबा दर्शविल्याच्या काही महिन्यातच आता पुन्हा जाधव यांनी एक धक्का देणारा राजकीय निर्णय घेतला तो म्हणजे बी.आर.एस.पक्षात जाण्याचा.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. हैदराबाद येथे जाऊन हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केल्याची चर्चा आहे. जाधव यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची लवकरच छत्रपती संभाजीनगर शहरात सभा घेऊन नांदेड प्रमाणे शक्ती प्रदर्शन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

हर्षवर्धन जाधव हे मनसेचे माजी आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऐन भरात असताना विधानसभेवर निवडून गेलेल्या १३ आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता

शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही जिंकली होती. मात्र, तिथेही त्यांचं बस्तान फार काळ टिकलं नाही. त्यांनी शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला. शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *