काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेत गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी लावून धरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधासभेत मोठा गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येऊन राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी केली. यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात संतप्त होत, सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.
या गदारोळप्रकरणी बाळासाहेब थोरात संतप्त झाले. “विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आजपर्यंत अनके आंदोलने झाली. आज देखील आंदोलन केलं गेलं. मात्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज ज्या प्रकारचं आंदोलन करण्यात आलं, तसं याआधी कधीच झालेलं नाही,” अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.
राहुल गांधी आमचे आदरणीय नेते आहेत. आमच्या नेत्यांच्या बाबतीत असा प्रकार त्यांनी केला. शेवटी सर्वच पक्षांचे राष्ट्रीय पातळीला, राज्य पातळीला नेते असतात. असं जर या आपल्या विधानभवनाच्या परिघांमध्ये घडत असेल तर ते दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत ही हेच घडू शकतं. ही वस्तुस्थिती आहे,” असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
काही कारण नसताना गोंधळ घातला जात होता. राहुल गांधींवर ते आरोप करत होते की, परदेशामध्ये जाऊन त्यांनी देशाची बदनामी केली. संसदेमध्ये ज्यावेळेस राहुल गांधी यावर बोलण्याकरता वेळ मागता आहेत, उत्तर देण्याकरता वेळ मागत आहेत, त्यावेळेस त्यांना संधी द्यायला तयार नाही. आज ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं, त्यावर कारवाई व्हावी, अशी आम्ही मागणी केली आहे,” असे थोरात म्हणाले.