भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन विधिमंडळ परिसरात शिवसेना व भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. त्याचे पडसाद आज अधिवेशनात उमटले.
अजित पवारांचा आक्षेप
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला. अजित पवार म्हणाले, आतापर्यंत विरोधकांनी अधिवेशन व्यवस्थित चालू दिले. मात्र, आज सकाळी सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले. विधिमंडळाच्या आवारात अशी कृती करणे योग्य नाही. उद्या विरोधकही अशा पद्धतीने एखाद्या नेत्याविरोधात जोडे मारो आंदोलन करतील.
जोडो मारो आंदोलन करणार नाही
त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधिमंडळ परिसरात अशा पद्धतीने आंदोलन करणे योग्य नाही. विरोधी पक्षाच्या भावनेशी मी पूर्ण सहमत आहे. सभागृहाच्या आवारात कोणत्याही नेत्याविरोधात जोडो आंदोलन करणार नाही, असे मी सत्तारुढ पक्षाकडून आश्वासन देतो.
विधिमंडळात असे पूर्वी कधी घडले नव्हते
राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारल्याचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही निषेध केला. बाळासाहेब थोरात म्हणाले, विधिमंडळाच्या आवारात लोकांचे प्रश्न मांडायचे असतात. मात्र, आज विधानसभेत काही सदस्यांनी राहुल गांधींच्या फोटोला चपलीने मारण्याचा अविर्भाव केला. विधिमंडळाच्या आवारात असे यापूर्वी कधीही घडले नव्हते.