राज ठाकरे यांना जशी स्क्रिप्ट आली असेल तशी ती त्यांनी वाचली असेल, असा जोरदार टोला ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे. राज ठाकरे यांची काल शिवाजी पार्क येथील मैदानावर गुढी पाडव्यानिमित्त सभा झाली. या सभेतील भाषणावरुन उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे.
उद्धव ठाकरे विधानभवनात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, माहिमचे ते बांधकाम काही नवीन नाही. याआधी त्याठिकाणी दुसऱ्या पक्षाचे आमदार होते. त्यांच्या पक्षाचे आमदार होते. त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनचे ते बांधकाम होते. जशी स्क्रिप्ट आली असेल तशी राज ठाकरे यांनी वाचली असेल. एवढे वर्ष कारवाई होत नाही आणि आता होते. त्यामुळे राज्यात इतर अनेक प्रश्न आहेत. यासंदर्भात त्यांना पत्र लिहा. म्हणजे कारवाई होईल.
ती रेकॉर्ड तपासा
उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कालच्या सभेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, गेली 8 वर्ष तिच रेकॉर्ड घासूनपुसुन झाली आहे. गेल्यावर्षी 14 मेला बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्सला माझी सभा झाली होती. त्यावेळी मी एक मत मांडले होते. एका चित्रपटाचा दाखला मी त्यावेळी दिला होता. ती रेकॉर्ड तुम्ही आता देखील तपासू शकता.