महाराष्ट्र फार्मसीत अक्का फाऊंडेशन तर्फे महिला आरोग्य आणि काळजी याविषयीचे शिबीर संपन्न
निलंगा:-महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसी महाविद्यालयात अक्का फाऊंडेशन तर्फे महिला आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयीचे शिबीर संपन्न झाले. यामधे स्त्रियांची मासिक पाळी व त्याबद्दलच्या गैरसमज याबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थीनींना सखोल अशी माहिती देण्यात आली. यावेळी अक्का फाऊंडेशनच्या प्रणिता केदारे व पूजा सरवदे उपस्थित होते.
आपल्या शरीररूपी मंदिराची योग्य काळजी घेतली तर आपण आरोग्यपूर्ण आयुष्याची यात्रा आनंदाने पार करू शकतो. मुलींच्या शालेय जीवनापासूनच जर मासिक पाळी सारख्या विषयांत जागरूकता निर्माण केली तर याच मुली इतरांना आरोग्याच्या विषयांबाबत जागरूक करतील. अक्का फाऊंडेशनचा प्रोजेक्ट “आनंदी” गाव पातळीवर शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलींना आरोग्याबाबत आत्मविश्वास बहाल करत आहे. यातून एका सशक्त समाजाची निर्मिती होत आहे अशी माहिती त्यांनी दिली
‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी…’ अशा निराशाजनक वाक्याने आपल्या स्त्रीत्वाकडे अजूनही काही स्त्रिया पाहताना दिसतात. पाळी, त्यामुळे येणारी बंधने यामुळे अनेक तरुणी त्याविषयी चिडचिड करताना दिसतात. वास्तविक पाहता, पाळी येणे हे स्त्रीत्वाचे द्योतक आहे आणि निसर्गाने आपल्या कुशीत केवढी मोठी खुशी दिली आहे, हे समजून घेणे त्यामुळेच खूप गरजेचे आहे.
प्रत्येक मुलगी जन्म घेतानाच आपल्या कुशीत बीजांचा एक विशिष्ट साठा घेऊन जन्माला येते आणि वयात आल्यापासून पाळी जाईपर्यंत हा साठा बीज पक्व होऊन बाहेर टाकले जाऊन कमी कमी होत जातो. सृजनाची एवढी मोठी देणगी आपल्याकडे असते आणि आपल्याला मात्र त्या शक्तीचा, त्यामुळे आपल्याला होणाऱ्या लाभाचा काहीच पत्ता नसतो. पाळीचा संबंध केवळ मूल जन्माला घालण्याशी नाही. एकूणच स्त्रीचे आरोग्य चांगले राहावे, तिचे तारुण्य, सौंदर्य, हाडांचे, स्नायूंचे आरोग्य टिकावे यासाठी पाळी नीट येणे, वेळेवर येणे या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. स्त्रीस्वास्थ्याचा याच्याशी अगदी जवळचा संबंध असतो. अलीकडच्या काळात असे दिसून येते आहे, की वंध्यत्वाच्या समस्या वाढीला लागल्या आहेत, रजोनिवृत्ती लहान वयातच येऊ लागली आहे. या सगळ्यामुळे शारीरिक, मानसिक बदल होऊन स्त्रियांचे आरोग्य बिघडत चालले आहे. म्हणून प्रत्येक महिलांना जाणीव करून देणे, की आपल्या अंडाशयात जन्मतः जो बीजांचा साठा असतो तो कमी कमी होत गेला आणि आपण गर्भधारणेचा विचार वेळेवर न केल्यास समस्या उद्भवू शकते. वय कमी-जास्त असू शकते; पण त्यानुसारच बीजसाठा असेलच असे काही नाही. प्रत्येक स्त्रीचा बीजसाठा, तो कमी होण्याचा दर, हे सगळे वेगळे वेगळे असते. करिअरमुळे किंवा उशिरा विवाह केल्यामुळे मूल लवकर होऊ दिले नसल्यास गर्भधारणेला, खालावत गेलेल्या बीजसंख्येमुळे अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी आपला बीजसाठा किती आहे, याचे वेळीच परीक्षण करून, ज्या तरुणींना गर्भधारणा लांबवायची आहे त्यांना डॉक्टरच्या सल्ल्याने पावले उचलता येतील.
वाढत्या वयामुळे बीजसाठा कमी होतो, या सत्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. अन्य काही कारणांमुळे कमी वयातही असे होऊ शकते. आयफोन, आयपॅडच्या या जमान्यात, जीवशास्त्रीय साक्षरता वाढण्याचीही खूप गरज आहे. आपल्या शरीरातल्या या महत्त्वाच्या बाबींविषयी माहिती करून घेणे अतिशय आवश्यक आहे. जाणीव आणि जागृती असल्यास समजून उमजून निर्णय घेणे आणि आपल्या कुशीतले हे सौख्य अनुभवणे सहज शक्य होईल.
प्रत्येक तरुण स्त्रीने हे आवर्जून केले पाहिजे खाणे, झोपणे, एकूणच जीवनशैली आरोग्यपूर्ण ठेवणे. मासिक पाळी नियमित नसल्यास योग्य वेळी उपचार घेणे. आपला बीजसाठा किती शिल्लक आहे, याचे परीक्षण करून घेऊन त्यानुसार गर्भधारणेचा विचार करणे. उपलब्ध वैज्ञानिक सुविधांचा वापर करणे. आपल्या शरीराविषयी, आरोग्याविषयी जागरूक असणे गारजेचे आहे असे तौयांनी सांगितले .
यावेळी महाराष्ट्र फार्मसीचे प्राचार्य डॉ भागवत पौळ, प्रा राजश्री मोरे, प्रा सलमा कागरी, प्रा नंदा भालके, प्रा अरुणा पौळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साधना घोडके यांनी केले व प्रस्तावना प्रा राजश्री मोरे यांनी मांडले तसेच आभार प्रदर्शन प्रा नंदा भालके यांनी मांडले .