राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या दरम्यान विधानपरिषद सभागृह संबंधातली एक बातमी चांगलीच चर्चेत होती. सभागृहात एक संशयित व्यक्ती येऊन बसली होती, अशी तक्रार AMOL MITKARI यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे एका कागदावर लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. आता यावर खुद्द गोऱ्हे यांनीच खुलासा केल्यानंतर ही संशयित व्यक्ती नसून, सभागृहाचे सन्माननीय सदस्य रमेश कराड होते, हे स्पष्ट झाले आहे. १० मार्च रोजी हा प्रकार घडून आला होता.
विधानपरिषदेत याप्रकरणी खुलासा करताना नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले की, “काही लोकं विधीमंडळात अभ्यासासाठी येतात, काही लोकं कामकाज बघायला येतात. त्यांना आपण परवानगी दिली पाहिजे. १० मार्च रोजी आमदार अमोल मिटकरी यांनी माझ्याकडे तक्रार केली होती, सभागृहात निळा शर्ट परिधान केलेली, एक संशय़ित व्यक्ती कामकाज सुरू असताना सभागृहात बसली होती.”
“या तक्रारीमुळे मला काही तासांतच अनेक वृत्तवाहिन्यांचे फोन आले. सभागृहात कोण व्यक्ती आली होती, अशी विचारणा मला माध्यमांनी केली. याबाबतीत मी सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितलं. मी माध्यमांना विनंती केली बातमी लावू नका, अजून शहानिशा झाली नाही. पण कर्तव्यदक्ष माध्यमांनी ऐकंल नाही. त्यांनी याचे फुटेजही दाखवले. निळा शर्ट परिधान केलेली व्यक्ती कोण कोण होती? हे पाहिल्यानंतर कळलं की, ती व्यक्ती आमदार रमेश कराड आहेत. पण मिटकरी यांनी रमेश कराड यांना ओळखलंच नाही. त्यांनी ती दुसरी व्यक्ती वाटली,” असे सभापती गोऱ्हे म्हणाल्या.
“मिटकरींना कराड हे अज्ञात व्यक्ती का वाटावी? असा प्रश्न मला आहे. कराडांना मिटकरींना ओळखलं नाही. यामध्ये विधानभवन सुरक्षेची त्रुटी नसून, मिटकरी यांच्याकडून अनवधाने काही गोष्टी घडलेल्या आहेत,” असे सभापती गोऱ्हे म्हणाल्या.