तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाला असून 5 जखमीवर उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे.
सोलापूर-धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर गाडी अतिवेगात असताना सकाळी सातच्या दरम्यान तिचे टायर फुटले. या अपघातातील जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कटारे स्विमिंगजवळ झालेल्या अपघातावेळी बोलेरो वाहन तीन ते चार वेळा पलटी झाली आणि यात तिघांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर या सर्वांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केली असता तिघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर पाच जणांवर उपचार सुरू केले.अपघातातील जखमींपैकी तिघांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
जखमी पाच जणांवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार
गणेश नामदेव खैरनार (वय 32), पंकज रवींद्र खैरनार (वय 30), जीवन सुदीप ढाकणे (वय 25), तुषार बिडकर (वय 22), दीपक बिडकर (वय 24, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. यातील जखमी आणि मृत झालेले तरुण मंगळवारी सकाळी तुळजापूरला (एमएच 15 ई एक्स 3211) या बोलेरो वाहनातून सोलापूर ते तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सोलापूर उस्मानाबादच्या सीमेवर वाहन पलटी होऊन हा अपघात झाला आहे.
तीन मृतदेहांवर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. निखिल रामदास सानप (वय 21 वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय 22 वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जि. नाशिक), अथर्व शशिकांत खैरनार (वय 22 वर्ष, रा. चास, तालुका सिन्नर, जि. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.