आज विधानसभेत संजय राऊतांवर टीका करताना मंत्री दादा भुसे यांनी शरद पवारांचा उल्लेख केला. त्याचे जोरदार पडसाद अधिवेशनात उमटले.
मंत्री दादा भुसे यांना शरद पवार यांचे नाव घेण्याचे कोणतेही कारण नव्हते. आपल्या वक्तव्याबद्दल दादा भुसेंनी माफी मागावी, अन्यथा आम्ही सभात्याग करू, असा इशाराच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
काय म्हणाले दादा भुसे?
मंत्री दादा भुसे यांनी गिरणा अॅग्रो कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांकडून तब्बल 175 कोटी गोळा केले. मात्र, कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स 47 सभासदांच्या नावावर दाखवले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर उत्तर देताना दादा भुसे म्हणाले, संजय राऊत हे महागद्दार आहेत. भाकरी मातोश्रीची खातात, मात्र चाकरी शरद पवारांची करतात. मी जर एका रुपयाचाही भ्रष्टाचार केला असे सिद्ध झाले तर आमदारकी, मंत्रीपदाचा राजीनामा देईन. संजय राऊत यांनी माफी मागायला हवी.
अजित पवार संतापले
दादा भुसेंनी शरद पवारांचे नाव घेताच अजित पवार संतापले. सभागृहात अजित पवार म्हणाले, मंत्री दादा भुसे यांनी शरद पवारांचे नाव घेण्याचे कोणतेच कारण नव्हते. नरेंद्र मोदीदेखील शरद पवारांविषयी आदर व्यक्त करतात. अशावेळी दादा भुसे अशा शब्दांत शरद पवारांवर टीका करतील, अशी अपेक्षा नव्हती. दादा भुसेंनी आपले शब्द ताबडतोब मागे घ्यावे आणि दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा आम्हाला सभात्याग करावा लागेल.
दादा भुसेंचे स्पष्टीकरण
अजित पवार संतापताच दादा भुसे यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. दादा भुसे म्हणाले, मी माननीय शरद पवार यांच्याबद्दल एकही ब्र शब्द किंवा नकारार्थी शब्द बोललेलो नाही. संजय राऊत हे महागद्दार आहेत. ते भाकरी मातोश्रीची खातात. मात्र, चाकरी माननीय शरद पवार साहेबांची करतात. एवढेच मी म्हटलो होतो. मी शरद पवारांचा अनादर केलेला नाही. विधानसभा अध्यक्षांनी माझ्या वक्तव्याची चौकशी करावी. मी चुकीचे बोललो असेल तर योग्य तो निर्णय घ्यावा.
शंभुराज देसाईंची दखल
दादा भुसे यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहताच उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी मध्यस्थी केली. शंभुराज देसाई म्हणाले, शरद पवार यांच्याविषयी केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आदर आहे. केंद्रात शरद पवारांनी राज्याचे नेतृत्व केलेले आहे. कृषिमंत्री म्हणून त्यांचे योगदान आम्ही काय सर्व देशानेच पाहीले आहे. दादा भुसे शरद पवारांबद्दल नव्हे तर संजय राऊतांबदद्ल बोलले. संजय राऊत आमच्या मतावर निवडून आले आहेत. आम्हाला डुक्कर, गटारातील पाणी, प्रेतं, असे काय काय संजय राऊत बोलून गेले. ते विरोधकांना कसे काय चालते?
पुढे शंभुराज देसाई म्हणाले, मंत्री दादा भुसे यांनी शरद पवारांबद्दल अनुद्गार काढलेले नाहीत. त्यांचा शरद पवारांचा अवमान करण्याचा उद्देशच नव्हता. त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. संजय राऊतांकडून आमचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आमच्या मतावर ते राज्यसभेत निवडून गेले आहेत. त्यांनी आधी राजीनामा द्यावा, स्वत:च्या बळावर निवडून यावे आणि मग बोलावे.
जयंत पाटीलही आक्रमक
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जंयत पाटील यांनीही दादा भुसे यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जयंत पाटील म्हणाले, दादा भुसे यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला. अध्यक्षांनी हा उल्लेख तातडीने सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावा. त्याला दिरंगाई केल्यास तो शब्द तसाच प्रसारमाध्यमांत प्रसारीत होते. त्यामुळे उशीरा कार्यवाही करून फायदा नाही.
राहुल नार्वेकरांची ग्वाही
यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना ग्वाही दिली की, कोणत्याही नेत्याबद्दल एकेरी भाषेत कुणीही बोलले असल्यास कामकाजातून ते आज संध्याकाळपर्यंत काढून टाकण्यात येईल. आजच्या अधिवेशन संपण्याच्या आधी मी ही कार्यवाही करेल, असे राहुल नार्वेकरांनी सांगितले.