पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जागतिक डाऊन सिंड्रोम दिन साजरा
लातूर, (जिमाका) : राज्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
फिजियोथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम, जिल्ह आदिव्यंग पुनर्वसन केंद्राचे शाम भराडिया, डॉ. योगेश नितुरकर, डॉ. भगवान देशमुख, मुख्याध्यापक अण्णा कदम, श्री. भंडारे, व्यंकट लामजने यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जनकल्याण समिती संवेदना प्रकल्प व दिव्यांग क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हा परिषद इमारत परिसरात आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. यावेळी डॉ. योगेश निटुरकर यांनी मार्गदर्शन करताना जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाचे महत्व विषद केले.
केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील यांनी डाऊन सिंड्रोम असलेली मुलेही नृत्य, नाटिका या क्षेत्रामध्ये पारंगत होऊ शकतात. पोहण्याच्या स्पर्धेमध्ये या मुलांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत बाजी मारली असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने निरामय आरोग्य विमा योजना तसेच कॉक्लिअर इंप्लांट ऑपरेशन करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. तसेच दिव्यांगांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी सांगितले.
रॅलीमध्ये समाजकल्याण विभागाचे राजेंद्र गायकवाड, दत्तात्रय कुंभार, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे डॉ. भगवानराव देशमुख, श्री. पैकै, डाऊन सिंड्रोम विद्यार्थी, त्यांचे पालक, दिव्यांग क्षेत्रात कार्यरत विविध थेरपीस्ट, डॉक्टर्स, मुख्याध्यापक विशेष शिक्षक, संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, जीवन विकास प्रतिष्ठान, संत गाडगेबाबा अनाथ गतिमंद मुलांचे बालगृह, संत बापू देव साधू निवासी गतिमंद विद्यालय, वेताळेश्वर शिक्षण संस्था, फिजिओथेरपी महाविद्यालय, कै. वसंतराव काळे होमिओपॅथी महाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.