• Thu. Aug 14th, 2025

अखिल भारतीय स्त्री रोग लॅप्रोस्कोपिस्टस संघटनेच्या  सचिवपदी डॉ. कल्याण बरमदे यांची निवड

Byjantaadmin

Mar 21, 2023

अखिल भारतीय स्त्री रोग लॅप्रोस्कोपिस्टस संघटनेच्या  सचिवपदी डॉ. कल्याण बरमदे यांची निवड
लातूर : अखिल भारतीय स्त्री रोग लॅप्रोस्कोपिस्टस संघटनेच्या ( आएएजीइ ) सचिवपदी लातूर येथील प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपीस्ट्स डॉ. कल्याण बरमदे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बरमदे यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इंडियन असोसिएशन ऑफ गायनॅक एंडोस्कोपिस्टस ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असणारी जुनी संघटना असून देशपातळीवर एकूण सहा हजार पेक्षा जास्त स्त्री रोग तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपीस्ट्स या संघटनेचे सदस्य आहेत. दुर्बिणीद्वारे गर्भ पिशवी – गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया करणे, वाहक नलिकेत अडकलेला गर्भ काढणे , गर्भपिशवीवरील वेगवेगळ्या आजारांचे निदान करून अचूक उपचार करण्याची ही प्रणाली असून मागील तीस वर्षांपासून या संघटनेने स्त्रियांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत. या शस्त्रक्रियेचे फायदे असे असतात की, रुग्ण शस्त्रक्रियेनंतर एक ते दोन दिवसात आपल्या घरी जाऊ शकतो. रुग्णाच्या पोटावर टाके येत नाहीत. रुग्णाला रक्त द्यावे लागत नाही, तसेच खर्चही कमी येतो. रुग्ण पंधरा दिवसाच्या आत कामावर जाऊ शकतो. या संघटनेवर आतापर्यंत मुंबई, पुणे, दिल्ली येथील डॉक्टर संघटनेवर अध्यक्ष व सचिव म्हणून काम करत असत. आता पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. पंडित पळसकर हे अध्यक्ष म्हणून तर लातूरचे डॉ. कल्याण बरमदे सचिव म्हणून काम करणार आहेत. या निवडीने ग्रामीण भागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मागील तीस वर्षांपासून केलेल्या रुग्णसेवा व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांना योग्य न्याय मिळाला आहे. आता या संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी स्विकारलेले डॉ. कल्याण बरमदे हे सन २०२५ मध्ये या संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान होतील.
डॉ. कल्याण बरमदे यांनी आतापर्यंत १२ राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केलेले असून लातूर शहरात आतापर्यंत वेगवेगळ्या मोफत शस्त्रक्रिया शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सन २००४ पासून आजपावेतो त्यांनी बरमदे हॉस्पिटलच्या माध्यमातून लातूर सारख्या ग्रामीण भागात दहा हजारांहून अधिक महिलांवर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या या अद्यावत तंत्रज्ञानाच्या साथीने केल्या जाणाऱ्या रुग्णसेवेचा फायदा ग्रामीण भागातील हजारो गरजू महिला, रुग्णांना होत आहे. सन २०१६ पासून ते या संघटनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत आले आहेत. कोचीन येथे पार पडलेल्या संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेत डॉ. पी.जी. पॉल यांच्या हस्ते सचिवपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. भास्कर पाल , उपाध्यक्ष डॉ. अतुल गणात्रा, सहसचिव डॉ. सुधा टंडन, कोषाध्यक्ष डॉ. सुजल मुंशी व डॉ. सुभाष मल्ल्या यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत ६०० तज्ज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष तर ३०० डॉक्टर ऑनलाईन सहभागी झाले होते. या परिषदेत डॉ. कल्याण बरमदे व इतर तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचाही लाभ शेकडो डॉक्टरांनी घेतला.
डॉ. कल्याण बरमदे यांच्या या निवडीबद्दल डॉ अजय पुनपाळे , डॉ. मुकुंद भिसे, डॉ. अजय जाधव, डॉ. एस.एन. जटाळ ,डॉ. डी.एन.चिंते, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. चांद पटेल, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. संगीता देशपांडे, डॉ. वैशाली दाताळ , डॉ. रचना जाजू, डॉ. अनुसया वलसे , डॉ.स्नेहल देशमुख यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *