• Thu. Aug 14th, 2025

सौर ऊर्जा ही काळाची गरज-आ. विक्रम काळे

Byjantaadmin

Mar 20, 2023

सौर ऊर्जा ही काळाची गरज-आ. विक्रम काळे
लातूर : दिवसेंदिवस वाढत चाललेली विजेची मागणी आणि तुटवडा याचा विचार करता सौर ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी सौर ऊर्जाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले.
धाराशिव व छत्रपती संभाजीनगरनंतर लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील मलंग बिझनेस सेंटर येथे सौर ऊर्जाबाबत सेवा देणार्‍या एनर्जी बास्केट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रविवारी उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी उद्घाटनपर भाषणात आ. काळे बोलत होते. यावेळी अ‍ॅड. आनंदसिंह बायस, राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे, दिनकर राजेहोळकर, सोहेल पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. काळे म्हणाले, अपारंपारिक ऊर्जा स्रोत म्हणून सूर्य किती महत्त्वाचा आहे हे यावरून सिद्ध होते. या पुढील काळात विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेचा तुटवडा भासणार आहे. हा पर्याय कमी किमतीत उपलब्ध होतो. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे सांगून आ. काळे यांनी या कंपनीला शुभेच्छा दिल्या.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एनर्जी बास्केट कंपनीने दहा टक्के डिस्काउंटची ऑफर ठेवली आहे. याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन होळकर व पठाण यांनी केले. तसेच भविष्यात सौर ऊर्जेला किती महत्त्व आहे याबाबत माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर राजेहोळकर यांनी तर सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले. यावेळी अन्य मान्यवर व ग्राहक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *