• Fri. Aug 15th, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिंदेंसोबत येणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

Byjantaadmin

Mar 19, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत, असा मोठा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानात सभा होणार आहे. शिंदे गटाने या सभेची जय्यत तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात धक्का?

उदय सामंत म्हणाले की, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील 13 ते 14 आमदार आमच्याकडे येणार आहेत हे नक्की. कोण आमच्यात येणार आहेत ते त्यांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच माहित, असे उदय सामंत यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड मैदानावर भव्य जाहीर सभा झाली होती. या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. आता याच मैदानावरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे.

कोकणासाठी अनेक योजना

उदय सामंत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत सांगितले होते की, मी रिकाम्या हाताने आलेलो आहे. माझ्याकडे माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसे बोलणार नाही. कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना आहेत. त्याची उधळण मुख्यमंत्री या सभेत करतील. आमचे हात रिकामे आहेत म्हणून तुम्ही आमच्याकडे पाहात राहा, अशा प्रकारचे सहानुभूतीपूर्वक भाषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार नाहीत, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.

अनंत गीतेंनीच बंडाची सुरुवात केली

पुढे उदय सामंत म्हणाले, उद्धव ठाकरेंची सभेत कोणताही विचार नव्हता. त्यामुळे त्या सभेला आपण सभा म्हणू शकत नाही. सभेत उद्धव ठाकरेंनी फक्त शिव्या दिल्या. विरोधकांसाठी लांडगा, कोल्हा अशी विशेषणे वापरण्यातच उद्धव ठाकरेंनी धन्यता मानली. माजी खासदार अनंत गीते यांनीही जोरदार टीका केली. पण बंडाची सुरुवात माणगावमध्ये अनंत गीते यांनीच सुरू केली होती. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिले होतं.

उदय सामंत म्हणाले, शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, असे अनंत गीते म्हणाले होते. त्यांनीच कोकणात प्रथम उद्धव ठाकरेंविरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. ज्यांनी बंडाशी सुरुवात केली तेच आता एकनाथ शिंदे यांना शिकवायला चालले आहेत. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. यासभेतून कोकणच्या विकासाची दिशा स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *