शिंदे गट आणि भाजप सध्या राज्यात सत्तेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित राज्याच्या कारभार सांभाळत आहेत. मात्र, दोन्ही गटाचे कार्यकर्ते यानेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चोपून काढले आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.
मुंबईच्या दहीसर परिसरात भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. भाजप कार्यकर्त्याला तुफान मारहाण करण्यात आली आहे. बिभिषण वारे असे मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप वारे यांनी केला आहे.
वारे यांनी तीन महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. तर नवनाथ नवाडकर यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सूर्वे यांचा बॅनर काढून नवाडकार यांच्या पक्ष प्रवेशाचे बॅनर लावल्यावरून हा वाद झाला. या वादातूनच ही मारहाण झाल्याचे समजते. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात दोन्ही गटांमध्ये वाद
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघ असेलल्या सिल्लोड तालुक्यात देखील दोन्ही गटांमध्ये वाद पहायला मिळाला होता. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड शहरात नगरपालिकेनं प्रचंड करवाढ केल्याचा आरोप भाजपने केला होता. या करवाढी विरोधात याआधीही भाजपनं ढोलबजाव आंदोलन केलं होते. राज्यभरात अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पहायला मिळतो.