नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेब हे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे. देशातील प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. देशातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे शरद पवार हे विश्वगुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रित राहून काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. श्री. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समता परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
श्री. भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्याकडे दूरदृष्टी आहे. त्यांनी देशातील आणि राज्यातील ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. शासनाचा कारभार करतांना सरकारचा आणि सत्तेचा विचार हा जनतेसाठी झाला पाहिजे. पवार साहेबांनी आपल्या सत्तेच्या कार्यकाळात सर्व जनतेला न्याय दिला. त्यांच्या हिताची जोपासना केली. त्यांना यापुढील काळातही आपल्याला अधिक ताकद द्यायची आहे.
राष्ट्रवादी काँगेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. कमलकिशोर कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हरिराम भोसिकर, शहराध्यक्ष डॉ. किशोर कदम, बापू भुजबळ, ॲड. सुभाष राऊत, संघरत्न गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.