लातूर जिल्हयात गारपीटीने झालेल्या नुकसानीचे
तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या जिल्हा प्रशासनाला सुचना
लातूर प्रतिनिधी : मागच्या तीन दिवसात मराठवाड्यातील अनेक भागात वादळी पाऊस आणि गारपिट होऊन
काढणीला आलेल्या रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शुक्रवारी सायंकाळी आणि शनिवारी दुपारी लातूर जिल्ह्यात गारपिट होऊन हरभरा, गहू, ज्वारी ही पिके तसेच भाजीपाला व फळबागांची नासाडी झाली आहे. परिणामी अडचणीत आलेल्या या शेतकरी वर्गाला मदत मिळावी म्हणून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशा सुचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून केल्या आहेत. या संदर्भाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी सांयकाळी व शनिवारी दुपारी लातूर जिल्हयातील अनेक भागात वादळीवारे व गारपीटीसह पाऊस झाला त्यामूळे काढणीस आलेले रब्बी पिके, भाजीपाला व फळबागाचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी रेणापूर तालुक्यातील रेणापूर, खरोळा, रामवाडी, पोहरेगाव, कारेपूर, कुंभारवाडी, तळणी, मोहगाव, लातूर तालुक्यातील तांदुळजा, भोसा, पिंपळगावया पटटयात तसेच जळकोट तालुका व इतर ठिकाणी जोरदार गारपीट झाली. यात काढणीस आलेले गहू, हरभरा, ज्वारी, करडी व इतर रब्बी पिके, भाजीपाला,
अंबा, द्राक्षे व इतर फळबागाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. याबाबतीत विविध गावचे शेतकरी माहिती देत आहेत, आपल्या व्यथा मांडीत आहेत. संपर्क झालेल्या शेतकऱ्यांना आमदार देशमुख यांनी धीर दिला असून शासनाकडूनमदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अवकाळी पाऊस आणि गारपीटीमूळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सुचना दिल्या आहेत.