• Fri. May 9th, 2025

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा संस्थाचालक संघटनेच्यावतीने सत्कार

Byjantaadmin

Mar 18, 2023
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा
संस्थाचालक संघटनेच्यावतीने सत्कार
लातूर : राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी व जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांची सहकारी साखर संस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबईच्या संस्थेवर तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल शुक्रवारी लातूर जिल्हा संस्थाचालक संघटनेच्यावतीने ‘आशियाना’ निवासस्थानी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दिलीपराव देशमुख यांचे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून सुमारे तीस वर्षे अत्यंत पारदर्शकपणे काम केले. तसेच मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहात आहेत. जिल्हा बँक व मांजरा साखर कारखान्याला दिलीपराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळेच शंभरपेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखानेही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकडे त्यांचा कल असतो. सर्व घटकांचे योगदान हे आजपर्यंतच्या यशाचे गमक आहे, असे ते नेहमी सांगतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबईच्या संस्थेवर तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल लातूर जिल्हा संस्थाचालक संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थाचालक संघटनेचे कोषाध्यक्ष प्राचार्य डी. एन. केंद्रे, अध्यक्ष रामदास पवार, सरचिटणीस प्रा. गोविंद घार, सचिव बाबुराव जाधव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते आदी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळासोबत दिलीपराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध अडीअडचणींबाबत चर्चा करून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *