आमच्याकडे गुजरावरून आलेली निरमा वॉशिंग पावडर आहे. त्यामुळे आमच्याकडे जो माणूस येईल, तो स्वच्छ होईल, असे विधान थेट विधान परिषदेमध्येकरून भाजप आमदार रमेश पाटील यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. भाजप आमदाराने केलेले हे सत्यकथन सभापतींनी कामकाजातून वगळू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याच मुद्यावरून सरकारला घेरले आहे.
देसाई ठरले कारण
तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेले भूषण देसाई यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर विरोधकांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर विधान परिषदेत बोलताना भाजप आमदार रमेश पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
चांगला न्याय देतो
विधान परिषदेत रमेश पाटील म्हणाले की, भूषण देसाई नुकतेच शिवसेनेत आलेत. त्यांची चारशे कोटींची ‘एमआयडीसी’च्या प्लॉटची फाइल आहे. त्यामुळे ते आमच्याकडे आल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, त्यांना मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, इथे न्याय मिळणार आहे, म्हणून ते आलेले आहेत. तिथे काय केले आम्हाला माहिती नाही. इथले सरकार चांगले काम करते आहे. सरकार चांगला न्याय देते म्हणून ते इथे आले आहेत. खरे म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरावरून येथे आणली आहे. त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून आमच्याकडे जो माणूस येईल, तो माणूस स्वच्छ होणार आहे.

‘राष्ट्रवादी’कडून समाचार
राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश पाटील यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. त्यांचे हे मिनीट भराचे भाषण पक्षाच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले आहे. त्याला जोडलेल्या टिप्पणीमध्ये म्हटले आहे की, सबकी (भ्रष्टजनों की) पसंद ‘निरमा’ (BJP). भाजपच्या निवडून आलेल्या विधानसभेतील आमदारांनी विधान परिषदेत निवडून दिलेले भाजप आमदार रमेश पाटील यांनी मुक्ताफळे उधळून भाजप वॉशिंग मशीनचा खरा चेहरा उघड केला. मा. सभापती यांना विनंती की हे सत्य कथन सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
घोटाळेखोरांची पाठराखण
अजित पवारांनी याच मुद्यावरून विधान सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले. ते म्हणाले की, अतुल भातखळकर यांनी एमआयडीसीतल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी भूषण देसाई यांचे नाव घेतले होते. आता काही दिवसांपूर्वी भूषण देसाईंना शिंदे गटात घेतले. त्यांच्यावर तीन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ते लगेच स्वच्छ झाले. हाच विषय आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत काढत घोटाळेखोरांची पाठराखण केली. भूषण देसाई यांचा विषय काढल्यावर ते म्हणाले, कोणीतरी भूषण देसाई यांनी एमआयडीसीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. मात्र, हा भ्रष्टाचार झाकण्यासाठी ते आलेले नाहीत. हे सरकार चांगले चालले आहे म्हणून ते आले. त्यांना न्याय देणार आहे, म्हणून ते आले. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती आम्ही गुजरातवरून आणतो. त्यामुळे आमच्याकडे जो माणूस येईल, तो स्वच्छ होईल. आणि हे खरे आहे. असेही सांगायला ते कमी करत नाहीत, काय चाललेय सरकारमध्ये असा सवाल त्यांनी शिंदे यांना केला.