• Fri. Aug 15th, 2025

अमृता फडणवीस शुद्ध-पवित्र, मग 1 कोटींची लाच देणारे तुमच्या स्वयंपाक घरात पोहोचले कसे?

Byjantaadmin

Mar 17, 2023

भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारने तत्त्व आणि नीतिमत्तेच्या फालतू वल्गना करू नयेत हेच बरे. अन्यथा तुमचेच वस्त्रहरण होईल. अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले कसे? असा सवाल आजच्या सामनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आहे.

उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना तब्बल 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला आहे. काल विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यावरुन सवाल उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मात्र आजच्या सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडे

सामनात म्हटले आहे की, या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे. व त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे. कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील.

सामनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रस्त्यांवर कांदा ओतून भाजप सरकारचा निषेध केला, पण नाकाने कांदे सोलण्याचे या सरकारचे काम सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघड होऊनही उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त ‘आधीच्या सरकारने काय केले?’ हीच रेकॉर्ड वाजवून गुळगुळीत करीत आहेत.

भ्रष्टाचाराचे कुरण फुलले

सामनात म्हटले आहे की, फडणवीस हे नाकाने कांदे सोलत सांगतील की, कर नाही त्याला डर कशाला?’ फडणवीस तुमचे बरोबर आहे, पण ‘डर’ आम्हाला नसून तुमच्या लोकांना आहे व तुमच्याच संरक्षणाखाली भ्रष्टाचाराचे कुरण फुलले आहे. दौंडच्या भीमा पाटस साखर कारखान्याचा 500 कोटींचा घोटाळा समोर आला. शेतकऱ्यांचा पैसा भाजप आमदार कुल यांनी ‘हडप’ केला.

राजकीय विरोधकांवरच कारवाई

सामनात म्हटले आहे की, तुमच्या नाकासमोर भ्रष्टाचार घडला व तुम्ही आरोपींना वाचवत आहात. हेच काय तुमचे कायद्याचे राज्य? कर नाही त्याला डर कशाला? हे कुल यांच्यासारख्यांना सांगितलेत तर बरे होईल, पण भ्रष्टाचान्यांना संरक्षण देण्याचेच तुमचे धोरण आहे. मुंबईतील ‘मुका प्रकरणातील मुख्य आरोपी राहिले बाजूला, उलट राजकीय विरोधकांवरच कारवाई केली जात आहे.

महाराष्ट्र तुमच्या विरोधात

सामनात म्हटले आहे की, फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत. शेतकऱ्यांचे लाल वादळ पायपीट करीत मुंबईत थडकले. शिळयापाक्या बुरशी आलेल्या भाकऱ्या खाऊन शेतकरी पायपीट करीत आहे. सरकारी कर्मचारी संपावर आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या विरोधात असताना तुम्ही राजकीय विरोधकांचेच काटे काढणार असाल तर काटयाने काटा काढण्याचे तंत्र इतरांनाही अवगत आहे.

प्रकरण गंभीर

सामनात पुढे म्हटले आहे की, जरी अमृतावहिनींनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. प्रश्न इतकाच आहे की, या प्रकरणातील जे कोणी लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी? म्हणजेच या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *