गांधीनगर:- वंदे भारत या स्वदेशी बुलेट ट्रेनचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे .गुजरातमध्ये शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा गुरे ट्रेनला धडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात ट्रेनच्या पुढील भागाचे पुन्हा किरकोळ नुकसान झाले.
गांधीनगरहून मुंबईला जात असताना कंझरी आणि आनंद स्थानकादरम्यान हा अपघात झाला. एक दिवसापूर्वी मणिनगर स्थानकाजवळ म्हशींच्या कळपासोबत रेल्वेची धडक झाली होती.दुरुस्तीनंतर ही गाडी आज पुन्हा रुळावर आणण्यात आली होती.
गुजरातमधील आनंद स्थानकाजवळ एका गायीला ट्रेन आदळल्याने ट्रेनच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी ३.४८ वाजता मुंबईपासून ४३२ किमी अंतरावर असलेल्या आनंदमध्ये ही घटना घडली. याला दुजोरा देताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले, गाडीच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. ते पुढे म्हणाले की, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 सप्टेंबर रोजी गांधीनगर आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या नवीन आणि अपग्रेड आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवून ही सेवा सुरू केली. देशातील ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावू शकते, परंतु सध्या कमाल वेग 130 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे. गांधी नगर ते मुंबई दरम्यानची ट्रेन सुमारे साडेसहा तासांत हे अंतर कापते.
गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी वंदे-भारत एक्सप्रेस ट्रेनने म्हशींच्या कळपाला धडक दिल्याप्रकरणी रेल्वे संरक्षण दलाने (RPF) गुरांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईत म्हशींच्या कळपाला धडकल्यानंतर झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यात आली आहे. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ प्रवक्ते (अहमदाबाद विभाग) जितेंद्र कुमार जयंत म्हणाले, आरपीएफने अहमदाबादमधील वाटवा आणि मणिनगर रेल्वे स्थानकांदरम्यान वंदे भारत ट्रेनच्या मार्गावर येणाऱ्या म्हशींच्या अज्ञात मालकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.