तरूणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे: तुकाराम पाटील
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी द्वारकादास श्याम कुमार समूह लातूरचे मुख्य व्यवस्थापक तुकाराम पाटील यांनी तरुणांनी नोकरी मागणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनण्यासाठी स्वयंरोजगाराकडे वळावे असे प्रतिपादन केले. वाणिज्य आणि व्यवसायभिमुख विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारात अनंत संधी उपलब्ध असून त्यांनी स्थानिक बाजारपेठांचा बारकाईने अभ्यास करून जिथे आपण कमीत कमी पैशात चांगल्यात चांगला व्यवसाय करू शकतो अशा व्यवसायाची निवड करून स्वतःचा उद्योग सुरू करणे ही काळाची गरज बनली आहे असेही प्रतिपादन केले. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नसून स्वतः मधील क्षमता ओळखून आवश्यक त्या कौशल्यांचा विकास करणे गरजेचे बनले आहे व त्यानुसार बाजारपेठेत नोकरी मागण्या ऐवजी व्यवसाय किंवा उद्योगातून स्वयंरोजगार शोधावा व इतर बेरोजगार तरुणांना रोजगार देणारे बनावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. व्यवसाय ही 24 तासांची मोठी जबाबदारी असून घड्याळाच्या काट्याकडे न पाहता जो सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करतो तो यशस्वी उद्योजक झाल्याशिवाय राहत नाही असा कानमंत्रही यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम. एन. कोलपूके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील वाणिज्य विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रकाश रोडिया हे उपस्थित होते. यावेळी कौशल्य आणि उद्योजकता विकास कक्षाचे समन्वय डॉ. एम. एम. चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ. नरेश पिनमकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील वाणिज्य मंडळाचेही उद्घाटन करण्यात आले ज्यामध्ये कुमारी वैभवी जाधव हीची अध्यक्ष तर कुमारी निकिता सोळुंके हीची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश रोडिया यांनी उद्योजकांची आजच्या बदलत्या काळातील भूमिका आणि उद्योजकते मधील संधी यावर प्रकाश टाकला तसेच एक चांगला उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते गुण असावेत याचाही उहापोह त्यांनी आपल्या भाषणातून केला. वाणिज्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षभरात महाविद्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे व त्यातून यशस्वी उद्योजकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असा सल्लाही डॉ. रोडिया यांनी दिला. डॉ. कोलपुके यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात चालणाऱ्या बी.व्होक. या कौशल्याभिमुख व व्यवसायाभिमुख विद्याशाखेची माहिती सांगितली व त्यातून 35 हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये यशस्वीपणे काम करत आहेत याचीही माहिती दिली. प्रा. संदीप सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले तर सूत्रसंचालन कुमारी सुलक्षणा जगताप आणि कुमारी अश्विनी कांबळे यांनी केले. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. ए.बी. धालगडे, श्री संभाजी नवघरे, डॉ. हंसराज भोसले आणि प्रा. मयूर शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सूर्यकांत वाकळे, प्राध्यापिका शिल्पा कांबळे, प्राध्यापक अभिमन्यू गंगाजी व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.