मुंबई : यंदा राज्यात दसरा मेळाव्यांची मोठी चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षाचे दोन दसरा मेळावे झाले. बीकेसी मैदानात घेतलेल्या मेळाव्यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे या मेळाव्याची चर्चा होत असतानाच एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच सभास्थळावरून लोक निघून गेल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या टीकेवर शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
कोणीतरी ट्विटर वर व्हिडिओ व्हायरल केले आहेत. मात्र बीकेसीत किती लोक होते आणि का आले होते, ते संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं आहे. जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर इतके लोक आले असते का?’ असा सवाल एकनाथ शिंदे यांनी आपल्या टीकाकारांना विचारला आहे. तसंच बीकेसीतील आमच्या दसरा मेळाव्याला २ लाखांहून अधिक लोक उपस्थित होते, असा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी वंदनीय आहेत. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे राज्यातील लोकही आमची सोबत करत आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा मेळावा वादात?
‘मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात एमएमआरडीए मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने घेतलेल्या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन सेवेच्या, मुख्यत्वे ग्रामीण भागांतील नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या शेकडो एसटी बसगाड्या वापरण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड खर्च करतानाच मेळाव्याला जमलेल्या नागरिकांच्या खानपानसाठीही मोठा खर्च करण्यात आला. नोंदणीकृत पक्ष नसतानाही या गटाने १० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला असून या पैशांचा स्रोत काय, हे बेहिशोबी पैसे कुठून आले, या साऱ्याची चौकशी करण्याबाबत प्राप्तिकर विभाग व अन्य यंत्रणांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. त्यामुळे चौकशीचे आदेश द्यावेत’, अशा विनंतीची फौजदारी रिट याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. दीपक जगदेव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत केलेल्या या याचिकेवर १४ ऑक्टोबरला प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे