सोलापूर : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, ही मागणी करत मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत. २७ ऑगस्टला अंतरवलीहुन मुंबईकडे रवाना होणार आहेत. राज्यातील मराठा समाजाला जरांगे यांनी मोठे आवाहन केले आहे. ‘एक घर, एक गाडी’ या संकल्पनेतून येण्याचे त्यांनी आवाहन केले. सोबत पाण्याच्या टँकर देखील घेऊन निघा. आरक्षणाचा विजय मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, असे आवाहन जरांगेनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील हे बुधवारी सकाळी सोलापुरात आले होते. शासकीय विश्रामगृह येथे मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठी आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यावेळी जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांना कोणी काठीनेही डिवचायचं नाही.’जरांगे पाटील म्हणाले, मुंबईकडे मोर्चा जाताना मराठा समाजाच्या पोरांना कोणी काठीने देखील डिवचायचं नाही. पोलिसांच्या बळावर मराठा समाज बांधवावर अन्याय अत्याचार करणे बंद करा. आम्ही शांततेत येणार आहे, याअगोदर आम्ही शांततेत आलो आणि गेलो होतो. मराठ्यांनी वादग्रस्त काहीही करायचं नाही, जाळपोळ दगडफेक अशा कृती करायच्या नाहीत. कुणी केलं तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या, असेही जरांगेनी स्पष्ट सांगितले.जरांगे पुढे म्हणाले, कोणीही अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेन, तो सरकारचा व्यक्ती असेल, असं समजू. राज्य सरकारने नाटकं करू नये. आंतरवली सराटी येथे जशी मारहाण केली, तशी मारहाण करायची नाही. तुमचं तर कार्यक्रमच होणार आहे. तुमच्यामुळे मोदी सरकारचा देखील बट्ट्याबोळ होणार आहे, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
