• Thu. May 8th, 2025

धावत्या ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह, नंतर टायर फुटला; दोघांचा गाडीतच करुण अंत

Byjantaadmin

Mar 16, 2023

नाशिक : कोणाचा मृत्यू कसा होईल हे कधीच सांगता येत नाही. मरण कधी आणि केव्हा येईल हे देखील सांगता येत नाही. “कोणाच्या नशिबी कसा मृत्यू येईल हे परमेश्वरच जाणतो” ही म्हण खरी आहे. याच म्हणीची प्रचिती नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आली आहे. शेतात खत खाली करण्यासाठी गेलेल्या एका ट्रकमधील दोघांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोंबणाऱ्या विजेच्या तारांनी काही क्षणातच दोघांचं आयुष्य संपवलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असणाऱ्या पिंपळगाव बसवंत जवळील पालखेड ते डावसवाडी शिवरस्त्यावर ही घटना घडली. शेतकरी बाळासाहेब नाना आहेर यांच्या शेतात विजेच्या धक्क्याने ट्रक चालक आणि हमाल या दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतीसाठी लागणाऱ्या खतांनी भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १५ बीजे ७४८३) शेतात खाली करण्यासाठी निघाला होता. ट्रकला रस्त्यावर लोंबणाऱ्या वीजेच्या तारांचा धक्का लागला आणि ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला.

त्यानंतर ट्रकचे क्लिनर बाजूचे पाठीमागील टायर फुटले आणि चालक, हमाल बाहेर फेकले गेले. त्यामध्ये ट्रक ड्रायव्हर पारसनाथ गणपत पाल (वय ६३, रा. शिवशक्ती नगर, ठाणे, बेलापूर रोड, तुर्भे स्टोर, नवी मुंबई, तुर्भे, ठाणे) आणि हमाल विजय प्रल्हाद शिंदे (वय ३९, मुळ रा. सोनुन, ता. चोंढी, जि. अकोला, सध्या रा. दावचवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) या दोघांचा मृत्यू झाला. तर हमाल पप्पू सोमनाथ यादव याने गाडीतून उडी मारली. तोपर्यंत वीजप्रवाह बंद झाल्याने तो वाचला.

दरम्यान, या दोन जणांचा जीव घेणाऱ्या विजेच्या लोंबणाऱ्या तारा संदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा महावितरणाकडे तक्रार करून देखील उपाय योजना न झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. तारांचा व्यवस्थित बंदोबस्त न झाल्यामुळे सदर घटना घडल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. शिवरस्त्यालगत अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असून निष्पाप दोन जणांचा जीव घेणाऱ्या तारा तरी आता महावितरणाने व्यवस्थित कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. जर वेळीच महावितरणाने या तारांची दखल घेतली असती तर दोन जणांचा जीव गेला नसता अशी चर्चा परिसरात होत आहे.

घटना घडल्यानंतर घटनेची माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *