महाराष्ट्र महाविद्यालयात कवी इंद्रजीत भालेरावांच्या कवितेने रंगले वार्षिक स्नेह संमेलन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. या स्नेह संमेलनाच्या उद्घाटन ख्यातनाम ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांनी या उद्घाटनप्रसंगी आपल्या कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून स्नेह संमेलनाचा उत्साह निर्माण केला. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण जीवनाशी संबंधित ‘माझा शेतकरी बाप’, ‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’, ‘माझ्या जन्माची कहाणी’ यासारख्या प्रसिद्ध कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात ग्रामीण जीवनाबद्दल आत्मीयतेची, आपलेपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवरही प्रकाश टाकत असताना विद्यार्थ्यांनी परिस्थितीनुरूप बदलावयास हवे असा संदेशही त्यांनी याप्रसंगी दिला.
या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे होते. तर महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव मा. बब्रूवान सरतापे, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, प्रभारी प्राध्यापक डॉ. धनंजय जाधव यांची उपस्थिती होती. दोन दिवसाच्या या स्नेह संमेलनामध्ये स्वयंशासन दिन, काव्य वाचन, आनंद नगरी, शेला पागोटे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बक्षीस वितरण व समारोप समारंभ लातूर येथील रस्ते परिवहन अधिकारी मा.बजरंग कोरवले व प्रसिद्ध ग्रामीण कवी मा. श्रीगण रेड्डी, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. रस्ते परिवहन अधिकारी मा. बजरंग कोरवले यांनी रस्ते सुरक्षे संदर्भात विद्यार्थ्यांना उद्बोधित केले टा श्रीगण रेड्डी यांनी आपल्या अमोघ अशा काव्य शैलीतून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. बक्षीस वितरणामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने तर विविध विषयांमध्ये सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील संबंधित विषयाच्या प्राध्यापकांनी प्रायोजित केलेली बक्षिसे व विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांमधील बक्षिसेही याप्रसंगी वितरीत करण्यात आली. या वार्षिक स्नेह संमेलनाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी मोलाची भूमिका बजावली.