ट्रक चालक ते कोट्यधीश शेतकरी एक प्रेरणादायी प्रवास
- जिद्द,चिकाटीने उभारली आधुनिक रोपवाटिका
- कृषि विभागाकडून पॉलिहाऊस,शेडनेट व शेततळ्याचा लाभ
- परराज्यातही केला जातोय रोपांचा पुरवठा;सुमारे चार कोटींची उलाढाल
पारंपारिक शेतीला बगल देवून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली तर शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढते. मागणी-पुरवठ्याची साखळी लक्षात घेवून त्यानुसार उत्पादन घेतले तर सहा एकरातून सुमारे चार कोटी रुपयांचे उत्पन्न घेता येणे शक्य आहे, हे लातूर जिल्ह्यातील सोमनाथ मल्लिकार्जुन अंबेकर या शेतकऱ्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. सुरुवातीला ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या या केवळ इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या शेतकऱ्याने भाजीपाला, फुलझाडांच्या रोपवाटिकेतून आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट साधली आहे.. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास इतर शेतकऱ्यांना दीपस्तंभ म्हणून दिशादर्शक ठरणारा आहे, त्यासाठी त्यांच्या नर्सरीत जाऊन त्यांचा प्रवास जाणून तुमच्या समोर मांडत आहोत…!!
लातूर शहराला लागून मांजरा नदी खोऱ्यातलं लातूर – नांदेड या हमरस्त्यावरलं कोळपा हे सोमनाथ अंबेकर याचं गाव. या गावात सोमनाथ अंबेकर यांच्या कुटुंबियांची सहा एकर जमीन आहे. या जमिनीत पूर्वी आई-वडील पारंपारिक पिके घेत. त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंज्या स्वरूपाचे असल्याने सोमनाथ यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच ट्रकवर क्लीनर म्हणून नोकरी सुरु केली, नंतर स्वतः ट्रक चालक बनले. मात्र, 2005 मध्ये वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी सोमनाथ यांच्यावर आली. आई, पत्नी, लहान भाऊ, भावजय यांच्या मदतीने सोमनाथ यांनी शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. सुरुवातीला त्यांचा भर इतर शेतकऱ्यांप्रमाणे सोयाबीन, तूर यासारख्या पारंपारिक पिकांवरच होता.
2005 मध्ये त्यांनी सहा एकरात टोमॅटो लागवड केली. चांगला दर मिळाल्याने त्याकाळी त्यांना आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर पुन्हा पुढील हंगामात टोमॅटो लागवडीचा त्यांनी निश्चय केला, मात्र त्यांना रोपे उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःच टोमॅटो रोपांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. 2006 मध्ये त्यांनी अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन गादी वाफ्यावर टोमॅटोच्या रोपांची निर्मिती केली. आपल्या शेतात या रोपांची लागवड केली. रोपवाटिके (नर्सरी) पासून ते लागवड, निगराणी याबाबत योग्य गोष्ट योग्य वेळी देण्यात सातत्य ठेवल्यामुळे उत्तम गुणवत्ता, आणि चांगला उतारा मिळाला, हे टोमॅटो घेवून ते राज्यातील मोठ्या शहरांसह कर्नाटक, आंध्र प्रदेशातही स्वतः विक्रीला घेवून जात होते. स्वतः ट्रकचालक म्हणून काम केल्यामुळे मार्केटची तोंड ओळख होती, कोणत्या ठिकाणी कोणत्या शेतमालाला चांगला दर मिळतो, याचा त्यांना आदमास होता. त्याचा फायदा ते स्वतःच्या शेतातील टोमॅटो विक्रीसाठी करीत होते.
टोमॅटोचा दर्जा चांगला असल्याने बाजारपेठेत रोपांबाबत विचारणा केली जात होती. जिल्ह्यातील काही शेतकरी सोमनाथ अंबेकर यांच्याकडे टोमॅटोची रोपे उपलब्ध करून मागणी करू लागले. त्यामुळे त्यांनी रोपवाटिका सुरु करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी गादी वाफ्यावरच रोपांची निर्मिती करून त्या रोपांची विक्री केली. सन 2007-08 मध्ये त्यांनी कृषि विभागाकडून शेडनेटचा लाभ घेवून रोपवाटिकेला सुरुवात केली. टोमॅटो, मिरची, वांगी यासारख्या रोपांची निर्मिती सुरु केली. रोपांचा दर्जा चांगला असल्याने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडून मागणी होवू लागली.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध भाजीपाला पिकांच्या रोपांच्या उत्पादनास त्यांनी सुरुवात केली. हळूहळू इतर जिल्ह्यातील शेतकरीही रोपांसाठी अंबेकर यांच्या रोपवाटिकेत येवू लागले. रोपांची वाढती मागणी लक्षात घेवून अंबेकर कुटुंबियांनी रोपवाटिकेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. गेल्या पंधरा वर्षात टप्प्या-टप्प्याने विस्तार करीत आज संपूर्ण सहा एकर क्षेत्रावर सोमनाथ अंबेकर व भाऊ सिध्देश्वर अंबेकर कुटुंबियांनी रोपवाटिकेच्या माध्यमातून भाजीपाला, फुल पिकांची रोपे निर्मिती सुरु केली आहे. यासाठी सहा पॉलिहाऊस, दोन शेडनेटची उभारणी केली आहे. पाण्यासाठी विंधन विहीर असून कृषि विभागामार्फत शेततळ्याचा लाभही त्यांना मिळाला आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही सोमनाथ अंबेकर रोपवाटिकेतून रोपांचा पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोपांच्या पुरवठा करणाऱ्या अंबेकर कुटुंबियांच्या रोपवाटिकेची उलाढाल सुमारे चार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भाजीपाला, फुलपिकांच्या रोपांसह रोपवाटिकेसाठी आवश्यक साहित्य, बियाणांची विक्रीच्या क्षेत्रातही या कुटुंबियांनी पाऊल ठेवले आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारची बियाणे, खते व कृषि अवजारे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘अॅग्रो मॉल’ उभारण्याची तयारी या कुटुंबियांनी सुरु केली आहे.
रोपवाटिकेमुळे 25 जणांना नियमित रोजगार
कधीकाळी दुसऱ्याच्या ट्रक क्लीनर, ट्रकचालक म्हणून काम करणारे सोमनाथ अंबेकर हे आता इतरांना रोजगार देणारे शेतकरी बनले आहेत. त्यांच्या रोपवाटिकेमुळे आता 25 जणांना नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच जवळपास 30 ते 35 इतर मजुरांनाही हंगामानुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
परराज्यातही रोपांना मोठी मागणी – सोमनाथ मल्लिकार्जुन अंबेकर, सत्यम शिवम रोपवाटिका
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध करून देण्यासाठी सत्यम शिवम रोपवाटिका सुरु केली. गेल्या पंधरा वर्षात या रोपवाटिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध भाजीपाला, फुलपिकांची दर्जेदार रोपे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे या रोपवाटिकेची माहिती राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातही पोहचली आहे. टोमॅटो, मिरची, पत्ताकोबीसह पपई, शेवगा यासारख्या विविध 15 प्रकारच्या रोपांची निर्मिती आमच्या रोपवाटिकेत होते. या सर्व रोपांना महाराष्ट्रासह इतरही राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे रोपवाटिकेच्या माध्यमातून आता दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. रोपवाटिका उभारणीसाठी कृषि विभागाची मोठी मदत झाली असून पॉलिहाऊस, शेडनेट व शेततळ्याचा लाभ या विभागाकडून मिळाला आहे.
आधुनिक शेतीसाठी कृषि विभागामार्फत सहाय्य – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने
सोमनाथ अंबेकर यांचा सहा एकर शेतीच्या जोरावर ट्रकचालक ते कोट्यवधीची उलाढाल असलेल्या रोपवाटिकेचा मालक बनण्यापर्यंतचा प्रवास इतरही शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. आधुनिक शेतीच्या सहाय्याने चांगले उत्पन्न घेता येवू शकते, हे यावरून दिसून येते. यासाठी कृषि विभागामार्फतही पॉलिहाऊस, शेडनेट सारख्या बाबींना अनुदान देवून आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. या योजनांचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
– तानाजी घोलप, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर