• Thu. May 8th, 2025

अमृता फडणवीसांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर

Byjantaadmin

Mar 16, 2023

उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना तब्बल 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला आहे. अमृता यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अनिक्षा नामक महिला डिझायनर व तिच्या वडिलांनी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. अमृता यांच्या तक्रारीत लाच ऑफर करण्यासह धमकी व कट कारस्थानाचा उल्लेख आहे.

मलबार हिल पोलिस ठाण्यात अमृता यांनी 20 फेब्रुवारी राजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात कलम 120, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रकरण नक्की काय?

अमृता फडणवीस यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर 2021 साली पहिल्यांदा भेट झाली होती. अनिक्षाने सांगितले की, ती कपडे दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे अशी विनंती केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली, असेही अमृता म्हणाल्या.

पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, 27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात अनिक्षा तिथे भेटली. कार्यक्रम झाल्यावर अनिक्षाला कारमध्ये बसवले. तेव्हा बोलताना अनिक्षाने म्हटलं की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत होते. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर अनिक्षाला कारमधून खाली उतरवले, असे तक्रारीतही म्हटले आहे.

एक कोटी देण्याची तयारी

16 फेब्रुवारीला रात्री 9.30 च्या दरम्यान अनिक्षाने फोन केला. तेव्हा सांगितले की, तिच्या वडिलांना एका प्रकरणात आरोपी ठरवण्यात आले आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक कोटी रूपये देण्याची तयारी आहे. हे ऐकताच फोन कट करत तिचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर 18 फेब्रुवारीला रात्री 11.55 ते 12.15 च्या दरम्यान 22 व्हिडीओ क्लीप, तीन व्हॉईस नोटस अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर आले, असे अमृता फडणवीसांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *