सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव द्यावा, वाढलेली महागाईवरून आज विरोधक आक्रमक झालेत. त्यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच चूल पेटवून सरकारचा निषेध केला. विधिमंडळ अधिवेशनातली प्रत्येक घडामोड जाणू घेऊयात.
गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच चूल पेटवली व सरकारचा निषेध केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले आहे.
– आंदोलनात विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन न देणाऱ्या सरकारचा तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
– विधानसभेतील कामकाजादरम्यान मंत्री अनुपस्थित राहण्यावरून बुधवारी विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी पडसाद उमटले. मंगळवारी दहा मिनिटांचे कामकाज स्थगित केल्यानंतर बुधवारी (ता. 15) केवळ एक लक्षवेधी आटोपून विशेष सभेचे कामकाज मंत्र्यांअभावी स्थगित करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. परिणामी देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरत हा तर निर्लज्जपणाचा कळस झाल्याची टीका पवारांनी केली. कालच्या लक्षवेधींचा मुद्दा आज पुन्हा सभागृहात उपस्थित होणार असल्याची शक्यता आहे.