निलंगा:- जनमाणसाचा कानोसा घेतला तर तुम्हाला लोकमाणसांची मते कळतील, उद्याचं भविष्य हे शिवसेनेचेच असेल तेंव्हा भविष्यात शिवसेना `सुवर्णकाळ` आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील केळगाव येथील स्वराज्य प्रतिष्ठान व समस्त गावकरी बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केले. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली असून सरकारला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. शिवसेना येत्या निवडणुकीत पूर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात उतरणार असून जनमाणसात आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहाभुतीची लाट निर्माण होणार आहे. लवकरच शिवसेनेचा सुवर्णकाळ येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कांहीच दिलं नाही. शेतकरी उपाशीच आहे. त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याचा आरोप करून कांद्याला भाव नाही, कपाशीला भाव नाही, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्यांना तुटपुंज्या सन्मान निधीपेक्षा त्यांनी घाम गाळून शेतामध्ये पीकवलेल्या धान्याला योग्य हमीभाव दिला पाहीजे ही मागणी शेतकऱ्यांची आहे.
गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असतांनाही सरकारने अद्याप कोणतेही मदतीसाठी पाऊल उचलले नाही. अर्थसंकल्पात तर शेतकऱ्यांची घोर निराशा झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण वाताहत झाली असून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अपेक्षित होते. उत्पादन खर्च व बाजार भावामध्ये फार मोठी तफावत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.