राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी 100 खाटाची रुग्णालय उभारावीत -माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांची विधानसभेत मागणी
लातूर प्रतिनिधी : सोमवार दि. १३ मार्च २०२३ राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी १०० खटाची अद्यावत रुग्णालये उभारण्यात यावीत अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत
केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबई येथील बीपीटीतील जागेवर कर्क रुग्णावर उपचार करण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या धरतीवर स्वतंत्र रुग्णालय उभारण्याच्या संदर्भाने सभागृहात लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, सदरील ठिकाणी रुग्णालय उभारण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडून सूचना आलेल्या असतील तर स्वतः तज्ञ आणि जाणकार असलेल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी समिती नेमण्याची आणि त्यांच्याकडून अहवाल येण्याची वाट न पाहता तातडीने सदरील हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात घोषणा करावी. ठराविक रुग्णालयात उपचारासाठी कर्करुग्णांच्या होणाऱ्या गर्दीचा विचार करता फक्त एकच रुग्णालय नव्हे तर विदर्भ, मराठवाड्यातून येणारा समृद्धी महामार्ग जेथे मुंबईला जोडला जातो त्या ठिकाणी तसेच शिवडी-न्हावा-शेवा सागरी सेतू जेथे उभारला जात आहे तेथे कोकणात अशी रुग्णालये उभारली जावित, अशी सूचनाही त्यानं यावेळी मांडली. कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी देशभरात सॅटॅलाइट रुग्णालये उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेमार्फत पुणे, नागपूर, नाशिक, लातूर, नांदेड, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर यासह राज्यभरातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने १०० खटाची ही रुग्णालये उभारली जावीत अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी १०० खाटांची अद्यावत कर्करोग उपचार रुग्णालय उभारली गेल्यास, ग्रामीण भागातील कर्करोगग्रस्त रुग्णांना वेळेवर चांगले उपचार मिळतील शिवाय मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या अशा रुग्णांची संख्याही कमी होईल असेही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे.