लोकसभेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्याचे पडसाद राज्यसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले.राज्यसभेत भाजप नेते पियुष गोयल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
यावर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप नेते पियुष गोयल यांच्या राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. खर्गे म्हणाले, महाविद्यालयात लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्यांना देशद्रोही म्हटले जाते. पण खुद्द पंतप्रधान परदेशात असे बोलत असतील तर ते योग्य आणि राहुल गांधी म्हणाले तर ते चुकीचे ठरते, हा तर चोरांच्या उलट्या बोंबा असा प्रकार झाला, असा टोलाही खर्गे यांनी लगावा.
पीयूष गोयल यांनी राहुल गांधींचे भाषण त्यांच्या पद्धतीने मांडले.अशा पद्धतीने ते देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या राजवटीत लोकशाहीला जागा नाही. प्रत्येक स्वायत्त संस्थेचा गैरवापर सुरु असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
केंब्रिजमध्ये राहुल गांधींच्या भाषणाबाबत बोलताना खर्गे म्हणाले की, “महाविद्यालयात लोकशाहीबद्दल बोललो तर आम्हाला देशद्रोही म्हटले जाते.पण कोरियात बोलताना गेल्या 70 वर्षांत भारतात जे काही घडले, जे उद्योग वाढले,जी गुंतवणूक झाली,त्याचा मोदीजींनी निषेध केला. कॅनडामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी घाण करुन ठेवली आहे ती मी साफ करत आहे. परदेशात स्वतः पंतप्रधान असे बोलत असतील तर ते योग्य आणि राहुल गांधी काही बोलले तर ते चुकीचे कसे, असा सवालही खर्गेंनी उपस्थित केला आहे. सभागृहात बोलू देत नसल्याचा आरोप करत खर्गे म्हणाले की,’आम्ही अदानीच्या मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्याची मागणी करत आहोत.मला २ मिनिटेही बोलू दिले नाही. पियुष गोयल यांना बोलण्यासाठी 10 मिनिटे देण्यात आली.पण आम्ही बोलू लागलो की आमचे माईकही बंद केले जातात. असं असेल तर आम्हीही विक्रम वेताळासारखे तुमच्या मागे लागू.