राजकीय हेतूने माझ्या पप्पांची बदनामी सुरू आहे, अशी तक्रार आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. शीतल म्हात्रे यांनीही याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.
ठाकरे गटाचा आयटी सेल या मागे असल्याचा आरोप म्हात्रेंनी केला आहे. मात्र, जे लोक पन्नास खोके खाऊन आपली कामे करतात. त्यांचे व्हिडिओ आम्ही कशासाठी करू, असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
शिवसेनेच्या शिंदे गटाचे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी म्हात्रे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाचे अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे यांच्यावर गुन्हा दाखल दाखल करून ताब्यात घेतले आहे. या तिघांविरोधात आता आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. राजकीय वैमनस्यातून माझ्या वडिलांची बदनामी सुरू असल्याचे सुर्वे यांचे म्हणणे आहे.
विधिमंडळात उमटले पडसाद
विधिमंडळात आमदार भारती लव्हेकर, यामिनी जाधव, मनीषा चौधरी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की, एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही, असे कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचे. त्यामुळे तिचे आयुष्य बरबाद होईल. ती विवाहित महिला आहे. या कृत्यामागच्या सूत्रधारावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा असे आवाहन केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले.