विधान परिषदेच्या प्रतोद पत्रात मोठी चूक झाली आहे. राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेते पदी एकनाथ शिंदेंचे नाव असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समोर आणली आहे. पत्रातील चुकीचा मुद्दा जयंत पाटलांनी विधानसभेत उपसथित केला आहे.
जयंत पाटील काय म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदासाठी एकनाथ खडसेंची निवड व्हावी अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, 10 मार्च ला एक पत्र निघाले, त्यात असे म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानमंडळातील प्रतोद, आणि गटनेते पद रिकामे असल्याने त्याठिकाणी प्रतोदपदी अनिकेत तटकरे तर गटनेते विधान मंडळातील गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची नियुक्ती उपसभापतींनी केली आहे. हे मॉर्फ नाही, हे अजूनही वेबसाईटवर आहे.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर देशाचे पंतप्रधानच काल बदलून टाकले. देशाच्या पंतप्रधान पदावर द्रौपदी मुर्मू या आहेत असे जाहीर करुन टाकले आहे. यामुळे माझे विधीमंडळातील गटनेते पद धोक्यात आले आहे असा टोला लगावला आहे.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, नागालँडमध्ये जसे रिओ सगळ्या पक्षाचा पाठिंबा घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, जयंत पाटील यांनी दिलेली माहिती विधानपरिषदेच्या कामाकाजाची दिसत आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजाबद्दल विधानसभेच्या सभागृहात चर्चा करता येणार नाही. पण, विधिमंडळाचा उल्लेख केला असल्याने याविषयी सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू.