• Mon. May 5th, 2025

‘दिशा’समिती बैठकीत केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा आढावा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सर्व कामे गुणवत्तापूर्ण करावीत – खासदार सुधाकर शृंगारे

Byjantaadmin

Mar 12, 2023

‘दिशा’समिती बैठकीत केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा आढावा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सर्व कामे गुणवत्तापूर्ण करावीत – खासदार सुधाकर शृंगारे

  • मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या  कामांना गती द्यावी : खा. ओमप्रकाश निंबाळकर

लातूर,  (जिमाका) : प्रत्येक घराला नळजोडणी देवून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 945 योजनांसाठी 547 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेतील सर्व कामे गुणवत्तापूर्ण होतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा विकास, समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिल्या. तसेच समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास, समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक खा. शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार ओमप्रकाश निंबाळकर, सचिव तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री. धिवरे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अशासकीय सदस्य चंद्रकांत बाबया स्वामी, अनिल चव्हाण, अंगद भोसले यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे. या योजनेतील सर्व कामे चांगल्या दर्जाची व्हावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातही प्रत्येक घरांना नळजोडणी देण्याचे काम लवकरात लवकर हाती घेणे आवश्यक असल्याचे खा. शृंगारे यांनी सांगितले. तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देवून अधिकाधिक मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे. कामांची मागणी करणाऱ्या प्रत्येकाला या योजनेतून काम उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यात सुरु असलेल्या कामे गतीने करावीत. अटल भूजल योजनेतून जिल्ह्याला उपलब्ध निधीतून झालेल्या कामांचा आढावा घेवून या योजनेसाठी आणखी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे खा. शृंगारे यांनी सांगितले.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना गती द्यावी : खा. ओमप्रकाश निंबाळकर

ग्रामीण भागात शेतरस्ते हा अतिशय महत्वाचा विषय असून याविषयावरून मोठ्या प्रामाणात तंटे होतात. त्यामुळे शेतरस्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेली मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी विशेष मोहीम राबवावी. ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित गावातील लोकांना या रस्त्यांचे महत्व सांगून ही कामे पूर्ण करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे, असे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

जल जीवन मिशन योजनेतून करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा कायम ठेवावा. तसेच यासाठी उभारण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी वीजपंपा ऐवजी सौरपंप बसविल्यास वीज बिलाचा प्रश्न मिटेल, असे त्यांनी सांगितले. मूळ गावासह आजूबाजूच्या वाडी-वस्तीवरील कुटुंबांनाही या योजनेतून नळजोडणी देवून त्यांनाही पाणीपुरवठा करण्याच्या सूचना खा. निंबाळकर यांनी केल्या.

जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. तसेच मातोश्री ग्रामसमृद्ध पाणंद रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून या योजनेच्या अनुषंगाने दर पंधरा दिवसाला जिल्हास्तरावर आढावा घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच अभिसरणातून ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालयाची उभारणीही करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेतून लातूर शहरात मंजूर असलेली घरकुले पूर्ण होण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आदी योजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

लातूर शहरातील लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण

प्रधानमंत्री आवास योजनेतून लातूर शहरातील एक हजार 870 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात दहा लाभार्थ्यांना खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या हस्ते घरकुलाची चावी सुपूर्द करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *