अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अशा पद्धतीने पहाटे लोकप्रतिनिधी असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकणे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात, देशात असे वातावरण नव्हते
वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना कारवाईपासून दिलासा दिला आहे. तरीही ईडी अजून किती वेळा धाडी टाकणार? उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी अशा प्रकारे धाडसत्र राबवले जाते, हे आश्चर्यकारक आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून त्यांना अडचणीत आणायचे, हाच अजेंडा या धाडीमागे दिसून येतो. हसन मुश्रीफ यांना काहीही करून अडकवायचे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. देशात आणि महाराष्ट्रात असे वातावरण कधीही नव्हते.
सामान्यांचे जगणे कठीण होईल
जयंत पाटील म्हणाले की, विरोधच करायचा नाही, अशी सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे. देशात अशा पद्धतीतने तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात असतील तर सामान्य माणसाच्या बाजूने, त्याच्या अडीअडचणींबद्दल कुणीच बोलणार नाही. त्याचे जगणे कठीण होऊन जाईल. आजच्या ईडीच्या धाडीचा निषेध करावा तेवढा कमी आहे.
अधिवेशनात मुद्दा मांडणार
हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या धाडीचा मुद्दा आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील म्हणाले, आज आणि उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुट्टी आहे. आम्ही सोमवारी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याबाबत विचार करत आहोत. सोमवारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करू आणि त्यानंतर हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला जाईल.
जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी कारवाया
हसन मुश्रीफांवरील ईडीच्या कारवाईवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, जनतेच्या मुख्य समस्यांपासून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी ईडीकडून अशा धाडी टाकल्या जात आहेत. राज्य सरकार शेतीमालाला भाव द्यायला तयार नाही. अवकाळीग्रस्तांना मदत द्यायला तयार नाही, या मुख्य मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठीच या कारवाया केल्या जात आहेत