• Sun. May 4th, 2025

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड:राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी, घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त

Byjantaadmin

Mar 11, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. आज पहाटेच ईडीच्या 4 ते 5 अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे.

आरोप काय?

संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होती. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे

दीड महिन्यात दुसरी धाड

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व हसन मुश्रीफ यांचे समर्थक हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. या कारवाईविरोधात व केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. हसन मुश्रीफ सध्या घरी नाहीत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे.

उच्च न्यायालयाने कालच दिला होता दिलासा

हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारीच मोठा दिलासा दिला होता. हसन मुश्रीफ यांच्यावर तूर्तास कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. उच्च न्यायालयाने 24 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ईडी सध्या तरी हसन मुश्रीफ यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा हसन मुश्रीफ यांना अटक करणार नाही, अशी शक्यता आहे.

सूड भावनेने कारवाई, ठाकरे गटाची टीका

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडताच ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. सूड भावनेने भाजपविरोधी नेत्यांवर कारवाई करुन त्यांना उद्ध्वस्त केले जात आहे. देशात लोकशाही जिवंत आहे का?, असा प्रश्न पडावा, अशी चिंताजनक स्थिती असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. अरविंद सावंत म्हणाले की, उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना दिलासा आहे. मात्र, भाजप व भाजपच्या नियंत्रणाखाली असलेल्या तपास यंत्रणा आता उच्च न्यायालयाही जुमानत नाहीत, असे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *