• Sun. May 4th, 2025

आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका!:ईडी कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला अश्रू अनावर

Byjantaadmin

Mar 11, 2023

आम्हाला आणखी किती त्रास देणार? त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी दिली आहे.

घरात केवळ महिला, मुले

आज पहाटेच हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीच्या पथकाने धाड टाकली. हसन मुश्रीफ सध्या घरी नाहीत. घरात हसन मुश्रीफ यांच्या पत्नींसह काही महिला व मुले आहेत. त्यांच्या उपस्थितीतच ईडीच्या पथकाकडून घराची झाडाझडती घेतली जात आहे. दीड महिन्यातच दुसऱ्यांदा अशा पद्धतीने ईडीने धाड टाकल्याने हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ प्रचंड संतापल्या तसेच माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रूही अनावर झाले.

ईडीकडून त्रास दिला जातोय

अक्षरश: रडत सायरा मुश्रीफ यांनी माध्यमांना सांगितले की, समाजासाठी मुश्रीफ साहेबांनी आजवर खूप काम केले. अजूनही करत आहेत. मात्र असे असूनही ईडीकडून आम्हाला त्रास दिला जातोय. आणखी किती त्रास देणार आहात? आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका आणि इथून जा.

कार्यकर्त्यांकडून धीर

सायरा मुश्रीफ यांच्या या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर जमलेले कार्यकर्तेही आक्रमक झाले. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काही झाले तर आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सायरा मुश्रीफ यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच, केंद्र सरकार, भाजप व ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्त्यांचा हा आक्रमकपणा पाहून सायरा मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

आम्ही शांत बसणार नाही

हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार टीका केली. समर्थक म्हणाले, ईडीने धाड टाकली म्हणून आम्ही येथे आलो नाही. आम्ही आमच्या कामासाठी येथे आलो होतो. मात्र, साहेब घरात नसताना. घरी केवळ महिला असताना ईडीने अशी धाड टाकणे योग्य आहे का? हसन मुश्रीफ यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले आहे. आम्ही हे सहन करणार नाही. घरातील महिलांना, मुलांना काही झाले तर आम्ही शांत बसणार नाही. ईडीच्या आडून असे राजकारण करणे भाजपला एक दिवस नक्की भोवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *