• Sun. May 4th, 2025

सोमय्या तक्रार करतात अन् ईडी कारवाई करते”, मुश्रीफांच्या आरोपांनंतर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सोमय्यांच्या चौकशीचे निर्देश!

Byjantaadmin

Mar 10, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. “राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे”, असा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला होता. दरम्यान, आज या याचिकेवर सुनावणी पार पडली असून याप्रकरणी किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

तत्पूर्वी गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान हसन मुश्रीफ यांचे वकील आबाद पोंडा यांनी यासंदर्भात जोरदार युक्तिवाद करत सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असून भाजपाचे नेते kirit sommaya यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ते तक्रार करतात आणि त्यानंतर ईडी कारवाई करते. हे केवळ राजकीय षड्यंत्र आहे, असा दावा पोंडा यांनी केला होता. दरम्यान, आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने मुश्रीफ यांना दिलासा देत किरीट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीने अलीकडेच छापेमारी केली होती. तसेच त्यांच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा पाठी लावण्यासाठी माझ्याविरोधाच ‘हेतुपुरस्सर’ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. तसेच हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिकाही त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा ‘राजकीय हेतुने प्रेरित षडयंत्र’ आहे. मागील सहा ते सात महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता आपल्याला ईडी प्रकरणांमध्ये अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी हा सगळा घाट घातला जात असल्याचा दावा मुश्रीफ यांनी याचिकेद्वारे केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *