बंगळूर : कर्नाटक राज्यात पुन्हा सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या गळाला मोठा मासा लागला आहे. मंड्या मतदारसंघाच्या खासदार सुमलता अंबरीश यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपश्रेष्ठींनीही अंबरीश यांच्या पक्षप्रवेशाला मान्यात दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने इनकमिंगवरही जोर दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उत्सुकता निर्माण करणाऱ्या मंड्या लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुमलता अंबरीश अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सुमलता अंबरीश यांना पक्षात येण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले तर त्या आजच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुमलता अंबरीश यांनी आज मंड्या येथील निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली असून त्या आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मंत्री सी. एस. पुट्टाराजू यांनी सुमलता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मंड्या जिल्हा भाजपचे अध्यक्ष सी. पी. उमेश म्हणाले की, जिल्ह्यात भाजप आणखी मजबूत होईल. गेल्या अनेक दिवसांपासून ते आपल्या समर्थक, हितचिंतक आणि जवळच्या मित्रांशी सल्लामसलत करत आहेत आणि कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायचा याबाबत मतं गोळा करत आहेत. सद्यस्थितीत भाजपमध्ये सामील झाल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर येईल आणि त्यांना मंत्रिपद मिळेल, असे बहुतेकांचे मत होते.
काही दिवसांपूर्वी सुमलता यांनी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची भेट घेतली होती. आजकाल भाजप हाच सर्वोत्तम पर्याय आहे, असेही त्यांनी सुचवले. या सर्व बाबी लक्षात घेऊन सुमलता अंबरीश भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्या मंड्यातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या होत्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी न देता पाठिंबा दिला होता.