मुंबई : सागंली जिल्ह्यात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात विचारण्यात आल्याच्या मुद्यावरुन विधानसभेत वातावरण तापल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षनेते अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली.
अजित पवार यांनी खत खरेदीच्या वेळी जात विचारली जात असल्याच्या मुद्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून खत खरेदी करायची असेल तर त्यांना प्रथम जात सांगावी लागते. त्यानंतर पॉशमध्ये नोंद करावी लागते, त्यामुळं खत खरेदी करत असताना जात सांगण्याची गरज काय, असा सवाल अजित पवार यांनी केला. ई-पॉश मध्ये अपडेट झाल्यानंतर आता जात सांगावी लागते. जातीचं लेबल पुरोगामी महाराष्ट्रात चिकटवण्याचा प्रयत्न सरकारनं करु नये, असा इशारा अजित पवारांनी दिला. शेतकऱ्यांना खत खरेदी करताना जात सांगावी लागणार नाही याचा आदेश काढावा, असं अजित पवार म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. हा बदल सांगली जिल्ह्यापुरता झालेला नसून संपूर्ण राज्यभरात सरकारच्या आदेशानं बदल करण्यात आलेला आहे. हा आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आपण जात पात संपवायचा प्रयत्न करतोय, पण, आपण त्याला प्रोत्साहन देताय की का असा सवाल, पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.सुधीर मुनगंटीवार यांनी चूक झाली असेल तर चूक दुरुस्त केली पाहिजे, असं म्हटलं. केंद्र सरकारला ही चूक झालीय, ती बदलण्यात यावी यासंदर्भात दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं. नाना पटोले यांनी देखील या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. खत घेण्यासाठी शेतकऱ्यांची जात विचारली जाते. यासंदर्भात आवाज उठवला तर राईचा पर्वत केला जातो, असं मंत्री कसं म्हणू शकतात, असा सवाल नाना पटोले यांनी केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात येईल असं सांगितलं. सांगलीतील शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला होता. यानंतर विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, कृषी विभागानं शेतकऱ्यांना जात विचारली नसून वर्गवारी विचारण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे