लातूर : सध्या संपूर्ण देशात vande bharat चर्चा आहे. अधिक स्पीड आणि आधुनिक सेवा यामुळे ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय झालीय. मागच्याच महिन्यात मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘वंदे भारत’ च्या निर्मितीमध्येही आता महाराष्ट्र योगदान देणार आहे. latur मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये या रेल्वेच्या बोगीचं काम करण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.
कसा असेल प्रकल्प?
रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या दोन कंपनीच्या संयुक्त माध्यमातून 200 वंदे भारत रेल्वेची निर्मिती केली जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पार पडली असून अंतिम तयारी सुरू झालीय. लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात दोनशेपैकी 120 ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती करण्यात येणार आहे. तर उर्वरित 80 रेल्वे चेन्नईत तयार होतील, अशी माहिती क्षेत्रीय सल्लागार शामसुंदर मानधना यांनी दिली.मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी देशातील चौथा कारखाना लातूर येथे झाला आहे. उत्पादनास सुरुवात झाल्यानंतर पुढची 35 वर्ष रेल्वे बोगींच्या उत्पादनानंतरची देखभाल दुरुस्ती याच कंपन्यांना करावी लागणार आहे.
वंदे भारत ही सेमी हाय स्पीड ट्रेन असून ज्यामध्ये 16 सेल्फ प्रोफिल्ड कोच आहेत विशेष म्हणजे तिला वेगळ्या इंजिनची आवश्यकता असणार नाही. या रेल्वे गाड्या वातानुकूलित असून जिवाणूविरोधी प्रणाली यामध्ये असणार आहे. केंद्र सरकारने 2021 22 चा अर्थसंकल्पात 2024 ते 25 च्या अखेरीस भारतात 400 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्याचे महत्त्वकांक्षी लक्ष्य निश्चित केलं आहे. त्याचबरोबर विदेशातही या गाड्यांची निर्यात करण्याचं सरकारचं ध्येय आहे.