पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा 30 वर्षांपासून असलेला अभेद्य किल्ला महाविकास आघाडीने एकत्रित काम करून भेदला. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 10 हजार 950 मतांनी विजय मिळवला. त्यामुळे पुण्यातील आता भाजपच्या आमदारांचे टेन्शन वाढले आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या पाच हजार मतांच्या फरकाने जिंकलेल्या शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या तीन मतदारसंघातील आमदारांचे टेंशन वाढले आहे. या तीन मतदारसंघात महाविकास आघाडी आपला कसबा पॅटर्न वापरून काठावर निवडून आलेल्या या आमदारांना पराभूत करण्याची पुरेपूर रणनीती आखत आहे.
यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार भीमराव तापकीर, शिवाजीनगर मतदारसंघाचे सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे सुनील कांबळे यांच्या जागा महाविकास आघाडीत अशाच प्रकारे समन्वय राहिला तर धोक्यात येण्याची शक्यता राजकीय पंडितांनी वर्तविली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भीमराव तापकिरांना 1 लाख 20 हजार 518 मतं पडली होती. राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांना 1 लाख 17 हजार 923 इतकी मतं मिळाली होती. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने देखील निवडणूक लढवली होती. वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे आप्पा आखाडे यांना 5 हजार 931 इतकी मतं मिळाली होती. त्यामुळे भीमराव तापकीर यांना अवघ्या 2 हजार 595 मतांनी निसटता विजय मिळवता आला होता.
तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील कांबळे यांनी आपलं नशीब आजमावलं होतं. या निवडणुकीत त्यांना 52 हजार 160 इतकं मत मिळाली होती. तर काँग्रेसचे रमेश बागवे यांना 47 हजार 148 मते मिळाली होती. दुसरीकडे या मतदारसंघात देखील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच टेन्शन वाढवलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या लक्ष्मण आरडे यांना 10 हजार 26 इतके मतं मिळाली होती. तर एमआयएमच्या हिना मोमीन यांना देखील 6 हजार 142 इतके मते मिळाली होती.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपचे टेंशन वाढवणार
2019 च्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होती. आता मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी सोबत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची या तिन्ही मतदारसंघात ताकद ही अगदीच कमी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा पहिला आणि महत्त्वाचा सकारात्मक मुद्दा मानला जात आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केलेली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देखील या तीनही मतदार संघात अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, 2019 ला शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट हे मतदारसंघ धोक्यात आल्याचे भाजपचा लक्षात आल्यानंतर भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बऱ्याच पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी केली होती. शिवाजीनगरमध्ये मुकारी अलगुडे, दत्तात्रय गायकवाड, आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे यांच्यासह बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर कॅन्टोन्मेंट मध्येही सदानंद शेट्टी, सुधीर जानज्योत, रशीद शेख यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापैकी सदानंद शेट्टी हे आता राष्ट्रवादीमध्ये आहेत तर रशीद शेख यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तो फटका देखील आता भाजपला या तीनही मतदार संघात बसणार आहे.