होळी खेळून बाथरूममध्ये आंघोळ करणाऱ्या 2 दाम्पत्यांचा 2 वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झाला आहे. गॅस गीझर लीक झाल्यामुळे गुदमरून हे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. एक घटना मुंबईत, तर दुसरी तेथून सुमारे 1460 किमी अंतरावर असणाऱ्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादेत घडली आहे.
पहिली घटना मुंबईच्या घाटकोपरची
मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या दीपक शाह (40) व टीना शाह (35) यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ते येथील कुकरेजा टॉवरमध्ये राहत होते. याच टॉवरमध्ये त्यांचे काही नातेवाईकही राहत होते. होळीच्या दिवशी दाम्पत्याने कॉलनीत सर्वांसोबत होळी खेळली.
त्यानंतर ते आपल्या फ्लॅटमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाही. त्यामुळे त्यांचा एक नातलग त्यांना जेवण करण्यासाठी बोलावण्यासाठी गेला. त्यांनी दरवाजा ठोठावला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मोबाइलवरही फोन केला. पण त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.
अखेर त्यांनी पोलिसांना बोलावून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी डुप्लीकेट चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडला. तेव्हा पती-पत्नी फ्लॅटच्या बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. घाईगडबडीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांचा अगोदरच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
दुसरी घटना UP च्या गाझियाबादची
मुंबईहून 1460 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गाझियाबादेतील एका दाम्पत्याचाही असाच मृत्यू झाला आहे. दीपक गोयल (40) व त्यांची पत्नी शिल्पी (36) आपल्या 2 मुलांसह मुरादनगरच्या अग्रसेन कॉलनीत राहत होते. बुधवारी होळी खेळल्यानंतर दोघेही आंघोळीसाटी बाथरूममध्ये गेले.
दीपक व शिल्पी तासाभरापासून बाहेर पडले नाही. तसेच आतूनही आवाज आला नाही. त्यामुळे मुलांना संशय आला. त्यांनी त्यांना आवाज दिला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट शेजाऱ्यांना सांगितली. शेजाऱ्यांनी येऊन काच तोडून दरवाज्याची कुंडी उघडली. त्यांना पती-पत्नी दोघेही बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडल्याचे दिसले. त्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
दीपकने काही महिन्यांपूर्वीच सुरू केली होती फॅक्ट्री
दीपक गोयल यांनी काही महिन्यांपूर्वीच गाझियाबादमध्ये पेंटमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलची फॅक्ट्री सुरू केली होती. पत्नी शिल्पी गृहिणी होत्या. कुटुंबात 2 मुले होते. त्यात मुलगी 14 वर्षांची, मुलगा 12 वर्षांचा आहे. दीपकला 1 भाऊ असून, तो मुरादनगरच्या मोहल्ला ब्रह्म सिंह येथे राहतो.
दोन्ही प्रकरणांत पोलिसांचा एक सारखाच जबाब
दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र व उत्तर प्रदेश पोलिसांच्या मते, गॅस गीझर लीक झाल्यामुळे दोन्ही दाम्पत्यांचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नव्हते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. रिपोर्टनंतर मृत्यूचे खरे कारण कळेल.
गीझरमुळे कमी होतो प्राणवायू
गाझियाबादचे डॉक्टर प्रदीप यादव यांनी सांगितले की, गॅगस गीझरच्या बर्नर्समुळे निर्माण होणाऱ्या आगीमुळे ऑक्सिजनचा वापर जास्त होतो. यामुळे कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते. त्यातून कार्बन मोनो ऑक्साइडही तयार होतो. हा वायू रंगहीन, गंधहीन व विषारी असतो. हेच व्यक्तीच्या मृत्यूचे कारण बनतो. हृदय व मेंदूला गरजेनुसार प्राणवायू न मिळाल्याने व्यक्तीची शुद्ध हरपते. काही प्रकरणांत त्याचा मृत्यूही होऊ शकतो.