• Sun. May 4th, 2025

वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प:अजित पवार यांचा घणाघात, म्हणाले – चुनावी जुमला, हवेचे बुडबुडे, घोषणांचा सुकाळ!

Byjantaadmin

Mar 9, 2023

वास्तवाचा भान नसलेला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पातील आकडे म्हणजे हवेचे बुडबुडे आहेत. हा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. अर्थसंकल्पावरुन अजित पवार यांनी सरकारवर घणाघात केला आहे.

अजित पवार म्हणाले, घोषणांचा सुकाळ नसलेला असा हा राज्याचा अर्थसंकल्प आहे. जयंत पाटील, मी, सुनील तटकरे यांनी आत्तापर्यंत अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र या अर्थसंकल्पात शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले असा हा अर्थसंकल्प आहे.

अजित पवार म्हणाले, आज तुकाराम बीज आहे. मात्र देहूसाठी काहीच दिले नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र पंतप्रधानांनी भूमिपुजन केलेल्या स्मारकाचे पुढे काय झाले, त्यावर काहीच सांगितले नाही.

स्वप्नांच्या दुनियेत फिरवले

अजित पवार म्हणाले, या अर्थसंकल्पाला पंचामृत असे नाव दिले आहे. आम्ही सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात विकासाची पंचसूत्री मांडली होती. आता पंचामृत मांडून केवळ त्यांनी नाव बदलले आहे. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न झाला. आम्ही हे देणार, करणार असे म्हटले मात्र किती काय हे सांगितले नाही.

शब्दांचे इमले बांधले

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांना 6 हजार जाहीर केले आहेत. एका घरात 5 सदस्य आहेत. या रकमेला वाटले तर एकाच्या वाट्याला 3 रुपये येत आहेत. 3 रुपयात चहा तरी येतो का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ शब्दांचे इमले बांधलेत, असे पवार म्हणाले.

राज्य कर्जाच्या खाईत

अजित पवार म्हणाले, महिलांसाठी काही मध्यप्रदेशसारख्या घोषणा होतील असे वाटले होते. मात्र तसे काही झाले नाही. महाराष्ट्रावरील कर्ज साडेसहा लाख कोटीच्या पुढे गेले आहे. त्याबद्दल ते काही सांगायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अर्थसंकल्प कसा सादर करणार यावर पुस्तक लिहिले होते. मात्र तो कसा वाचायचा हे त्यांना कळाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *