मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणवर दावा करण्यासाठी शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाकडून गुरुवारी निवडणूक आयोगात आणखी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्जात शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह देण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे गटाला आमदारांचा पाठिंबा नसल्याचा दावा शिंदे गटाने अर्जात केला आहे. निवडणूक चिन्हावरील याचिकेवर तातडीने सुनावणी करून निकाली काढण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या लढतीत ७ ऑक्टोबर हा आजचा दिवस दोन अर्थाने महत्त्वाचा आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना ७ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही उमेदवारी अर्ज भरायचे असल्याने यालाही महत्त्व आहे. येत्या ३ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीसठी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजेच मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.
निवडणूक आयोगात आज दुपारी १ वाजता ही सुनावणी होणार आहे. यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगातील आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कायम राहणार की ते गोठवले जाणार? याचा निर्णय आज निवडणूक आयोगात होण्याची शक्यात आहे.
शिंदे गटाने यापूर्वी जुलैमध्येही शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणवर दावा केला होता. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला होता आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या मान्यतेचा दाखला दिला होता.