• Wed. Apr 30th, 2025

भाजपाने विरोध केलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाला मनसेचा जाहीर पाठिंबा

Byjantaadmin

Oct 7, 2022

मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटातील व्हीएफक्स आणि सैफ अली खानने साकारलेल्या ‘रावणा’च्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच दिला आहे. यादरम्यान मनसेने मात्र ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच चित्रपटावर होणारी टीका दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

“ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अँड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे. त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी आहे,” असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही – राम कदम

भाजपा आमदार राम कदम यांनी नुकतंच याबद्दल दोन ट्वीट केले आहेत. यात त्यांनी आदिपुरुष चित्रपटाला विरोध केला आहे. “आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी पुन्हा एका किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचं विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच पोहोचवली आहे. आता वेळ आली आहे… या विडंबनाचा फक्त माफीनामा.” असे राम कदम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed