काँग्रेसची भारत जोडो यात्रा सद्या कर्नाटकात आहे. गुरुवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची उपस्थिती होती. ते राहुल गांधींच्या सोबत चालत होते. त्यानंतर अचानक राहुल गांधींनी त्यांचा हात पकडला आणि धावायला सुरूवात केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओत दिसून येत आहे की, राहुल त्यांचा हात धरून धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री हसत हसत राहुल गांधींसोबत पुढे जातात. काँग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडिओवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहले आहे की, आता त्यांना तयारी करून जावे लागणार आहे.
काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची तयारी
कर्नाटक राज्यात पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. येथे कॉंग्रेसची थेट स्पर्धा भाजपशी आहे. त्यामुळेच काँग्रेस या ठिकाणी दिग्गज नेते सिद्धरामय्या आणि माजी कॅबिनेट मंत्री डी. के. शिवकुमार या दोघांना समान महत्त्व देत आहे. दोन्ही नेत्यांमधील संबंध दृढ करून कार्यकर्त्यांमध्ये एकीचा संदेश देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
सोनिया गांधी गुरुवारी यात्रेत सहभागी झाल्या होत्या
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरला केरळमधून सुरुवात झाली. 30 सप्टेंबरला ही यात्रा कर्नाटकात पोहोचली. 21 ऑक्टोबरपर्यंत येथे यात्रा सुरू राहणार आहे. गुरुवारी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधीसह विविध पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी पायी प्रवास केला. प्रकृती अस्वास्थामुळे सोनिया यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती

काँग्रेसचे दक्षिण कनेक्शन
सोनिया गांधी यांचे कर्नाटकशी गहिरे नाते आहे. जेव्हा-जेव्हा गांधी कुटुंबावर राजकीय संकट आले आहे, तेव्हा दक्षिण भारताने त्यांना सावरले आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही दक्षिण भारतातील जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचे सरकार सत्तेबाहेर गेले तेव्हा 1980 मध्ये त्यांना लोकसभेची सुरक्षित जागा हवी होती.
अशा परिस्थितीत त्यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधून निवडणूक लढवली. इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडक आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, नंतर त्यांनी रायबरेलीची जागा सोडली.