निलंगा:-जेवरी गावाचे उपक्रम शील सरपंच संजय जेवरीकर यांच्या संकल्पनेतून पुस्तकाचे सीमोल्लंघन या उपक्रमाच्या माध्यमातून आज जेवरीगावामध्ये ग्रंथदिंडी चे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला सांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख सूर्यवंशी विलास, सरपंच संजय जेवरीकर, महाराष्ट्र विद्यालय जेवरीचे मुख्याध्यापक नागेश तुबाकले,जिल्हापरिषदेचे मुख्याध्यापक संजय तांबोळे यांच्या हस्ते विविध ग्रंथानी सजवलेली ग्रंथ दिंडीच्या पालखीचे पूजन करण्यात आले व गावातून जिल्हापरिषद शाळा जेवरीचे विध्यार्थी, महाराष्ट्र विद्यालयाचे विध्यार्थी, गावातील भजनकरी मंडळी, जिल्हापरिषद शाळेचे लेझीम पथक,विविध वेशभूषेत सहभागी विध्यार्थी व बँडबाजा यांच्या तालावर वाजतगाजत भव्यदिव्य ग्रंथ दिंडी ची मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक विध्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्यात आली होती. वाचाल तर वाचाल,ग्रंथ हेच गुरू,ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट त्याचे आयुष्य होईल सपाट, ज्याच्या घरी तुकोबांची गाथा त्याचा चांगला राहील माथा, सही पुस्तक सही मस्तक अशा घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला. अनेक घरापुढे या ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले. अंगणवाडी ताईंनी भजनांचा ठेका धरला तर गुरुजनांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला. सरपंच,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनाही मोह आवरला नाही तेही विध्यार्थ्यांच्या सोबत ताल धरले. ही ग्रंथ दिंडी पाहण्यासाठी गावातील महिलांनी प्रचंड गर्दी केली. साहित्यसंमेलनात जशी साहित्याची पंढरी अवतरते तशीच अवस्था आज जेवरीत पहायला मिळाली. विध्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. गावकऱ्यांना ही पालखीला खांदा दयावा वाटत होते. ग्रंथ दिंडीचा समारोप जिल्हापरिषद शाळेच्या मैदानात करण्यात आला व उपस्थित गावकरी मंडळींच्या हस्ते पुस्तक व ग्रंथाचे पूजन करण्यात आले व पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संजय तांबोळे, तुबाकले नागेश यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोप करताना संजय जेवरीकर यांनी त्याना सुचलेली कल्पना व त्यानी वाचून झालेली पुस्तके भेट देण्याचे केलेले आवाहन व मिळालेला प्रचंड प्रतिसाद याची सविस्तर माहिती दिली दोन हजार पुस्तके यात ग्रामगीता, तुकोबांची गाथा, संविधान, स्पर्धा परीक्षा, जनरल नॉलेज अशी सर्व प्रकारची पुस्तके आहेत दहा हजार पुस्तकांचे वाचनालय सुरू करून दोनमजली ग्रंथालयाची इमारत उभी करण्याचा संकल्प केला व हे सर्वांसाठी खुले असणार आहे याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जाधव एम एम यांनी केले तर आभार कलशेट्टी पी एस यांनी मानले यावेळी गावातील स्त्री पुरुष दोन्ही शाळेचा शिक्षक स्टाफ,व विध्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती