मुंबई : तावदाने नसलेली खिडकी, खिळखिळी झालेली भूम आगाराची बस आणि त्यावर राज्य सरकारची जाहिरात यामुळे थेट अधिवेशनात चर्चेत आलेल्या धाराशिव मधील भूम आगारातील प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना मार्च अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. भूम आगाराला १० नव्या एसटी बस देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. तसेच निलंबित अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खिडक्या नसलेल्या, तावदाने तुटलेल्या बसचे फोटो दाखवून राज्य सरकारच्या विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पंचसूत्रीकडेच दुर्लक्ष झाल्याचे सप्रमाण दाखवून दिले. दरम्यान, भूम एसटी आगाराचे, वाहन परीक्षक डी. बी. एडके, एस. एन. हराळ, ए. यु. शेख या तिघांना निलंबीत केले असून हे निलंबन तातडीने मागे घ्यावे. तसेच अन्य अधिकाऱ्यांवरील कारवाई थांबवावी. कारवाईपेक्षा एसटी सुधारणेकडे महामंडळाने भर द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.
भूम आगाराचे वाहन परीक्षकासह अन्य दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात याचे आदेश प्राप्त होणार असल्याचे भूम आगार व्यवस्थापक यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने आयूर्मान पूर्ण झालेल्या गाड्यां निष्कासित करण्याचे धोरण लागू केले आहे. राज्य सरकारकडून देखील सरकारी गाड्या बाद करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यामुळे एसटी ताफ्यातील शेकडो गाड्या बाद होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा नव्या वळणावर, होळीलाच भाजपची साद, ठाकरे देणार का प्रतिसाद?